नवी दिल्ली, 01 डिसेंबर : भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री देशातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटू आहे. जगात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. छेत्रीला या उंचीवर पोहचवण्यात त्याच्या प्रशिक्षकांचे मोठे योगदान आहे. प्रशिक्षक सुब्रत भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बगानमध्ये छेत्री खेळायचा. सुब्रत भट्टाचार्या यांची मुलगी सोनमसोबत छेत्रीचं प्रेम होतं आणि त्यांनी 13 वर्षांनी एकमेकांसोबत लग्न केलं. विशेष म्हणजे इतकी वर्ष दोघांनीही हे नातं लपवून ठेवलं होतं. छेत्रीची लव्हस्टोरी रंजक आहे. छेत्री 18 वर्षांचा आणि सोनम 15 वर्षांची असताना दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. दोघांच्या लव्हस्टोरीतही तिच्या वडिलांची एक सवय कारण ठरली. सुब्रत भट्टाचार्य हे नेहमी त्यांच्या आवडत्या शिष्यांबद्दल सोनमला सांगायचे. सोनमने एक दिवस वडिलांच्या फोनमधून छेत्रीचा नंबर घेतला आणि मेसेज केला. त्यात तिनं फक्त आपलं नाव सांगितलं आणि आपण चाहती असून भेटायचं आहे असं म्हटलं. छेत्री सोनमला भेटायला तयार झाला पण जेव्हा भेटला आणि माहिती झालं की ती 15 वर्षांची आहे तेव्हा म्हणाला की, तु लहान आहेस आणि तुला अभ्यासाकडे लक्ष द्यायाला हवं. त्यानंतर छेत्री निघून गेला पण दोघामध्ये बोलणं सुरू राहिलं. छेत्रीचे प्रशिक्षक सुब्रत भट्टाचार्या यांचा फोन एक दिवस नादुरुस्त झाला. त्यांनी छेत्रीकडे तो ठिक करण्यासाठी दिला. त्यावेळी सोनमने वडिलांच्या फोनवर कॉल केला. तेव्हा तो नंबर पाहून समजलं की, आपण जिच्याशी बोलतोय ती प्रशिक्षकाची मुलगी आहे. त्यानंतर छेत्रीने सोनमला सांगितलं की, जर ही गोष्ट प्रशिक्षकांना समजली तर त्याचं करिअर संपेल. पुढे दोघांनी बोलणं बंद केलं. सोनम प्रशिक्षकाची मुलगी आहे समजल्यावर बोलणं जरी बंद केलं तरी तिचा विचार करणं मात्र छेत्री थांबवू शकला नाही. दोघांमध्ये हळूहळू पुन्हा बोलणं सुरू झालं. वर्षातून दोन-तीन वेळा भेटू लागले. यावेळी कोणाला माहिती होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागली. चित्रपट बघायला गेल्यावर सोनमचं तिकिट काउंटरवरच ठेवायचा. छेत्री आत गेल्यानंतर दहा मिनिटांनी ती जायची. तब्बल 13 वर्षांनी दोघांनीही लग्नाबद्दल घरच्यांशी बोलायचं ठरवलं. तेव्हा छेत्रीने प्रशिक्षकांना स्वत:हून सांगितलं की, तो आणि सोनम एकमेकांवर प्रेम करतात. दोघांनाही लग्न करायचं आहे. प्रशिक्षकांनी त्यांच्या लग्नाला सहमती दर्शवली आणि काही महिन्यांनी लग्नही झालं. छेत्रीने सोनमसोबतच्या नात्याबद्दल सांगितलं की, जेव्हा माझ्याजवळ काही नव्हतं तेव्हा ती माझ्यासोबत होती. मी पहिल्यांदा जिंकलो तेव्हा आणि पहिल्यांदा पराभूत झालो तेव्हाही ती सोबत होती. मी तिच्याशिवाय माझ्या आयुष्याचा विचार नाही करू शकतं आणि आजही ती माझी मोठी चाहती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







