मुंबई, 6 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. 9 मार्च पासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याकरता ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल करण्यात आला असून यामुळे भारताच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधार पदाची धुरा ही पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिकेत कमाल दाखवू शकला नाही आणि परिणामी भारताने नागपूर आणि दिल्ली येथे झालेले दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. परंतु इंदोर येथील तिसऱ्या सामन्यापूर्वी काही कौटुंबिक कारणामुळे कर्णधार पॅट कमिन्सला मायदेशात परतावे लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद हे स्टीव्ह स्मिथकडे देण्यात आले. यावेळी स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने मालिकेत जोरदार कमबॅक करून मालिकेत 2-1 ने पिछाडी भरून काढली.
अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पूर्व कर्णधार पॅट कमिन्स पुन्हा संघात परतेल अशी शक्यता होती. परंतु सोमवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चौथ्या सामन्यासाठी संघाच्या कर्णधार पदासाठी अधिकृत घोषणा केली. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ कडे ऑस्ट्रेलियाच्या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. अहमदाबाद येथील चौथा कसोटी सामना जिंकणं हे भारतासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे. कारण हा सामना जिंकला तरच भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन स्पर्धेची फायनल गाठता येईल. परंतु आता ऑस्ट्रेलियाच कर्णधारपद हे स्टीव्ह स्मिथ कडे आलस्याने भारताची डोके दुखी वाढली आहे.