मुंबई, 21 मार्च : भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या (All England Championship) फायनलमध्ये पराभूत झाला. त्याला डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेननं (Viktor Axelsen) सरळ गेमनं पराभूत केलं. व्हिक्टरनं ही मॅच 21-10, 21-15 या फरकानं जिंकली. 20 वर्षांच्या भारतीय खेळाडूनं संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ केला. त्याने सेमी फायनलमध्ये गतविजेत्या के ली जि जियाचा पराभव करत सर्वांना चकीत केले होते. फायनलमध्ये त्याचा अनुभव कमी पडला. व्हिक्टरनं दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. यापूर्वी त्यानं 2020 साली ही स्पर्धा जिंकली होती. नंबर 1 व्हिक्टरनं मॅचची सुरूवात जोरदार करत 5-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सेननं काही पॉईंट्स मिळवले. पण, व्हिक्टरनं ही आघाडी कमी होऊ दिली नाही. त्यानं पहिला् गेम 22 मिनिटांमध्ये जिंकला. दुसऱ्या गेममध्येही व्हिक्टरनं 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सेननं संघर्ष करत 4-4 अशी बरोबरी साधली. त्यानंतर व्हिक्टरनं सलग 4 पॉईंट्सची कमाई करत 8-4 अशी आघाडी घेतली. सेननं त्यानंतरही प्रतिकार केला, पण त्याचा निभाव लागला नाही. दुसरा गेम व्हिक्टरनं 31 मिनिटांमध्ये जिंकला.
There was stopping him today 💪 🇩🇰
— 🏆 Yonex All England Badminton Championships 🏆 (@YonexAllEngland) March 20, 2022
Viktor Axelsen at his imperious best, as he wins the YONEX All England Men’s Singles with a 21-10 21-15 victory over Lakshya Sen!#YAE22 pic.twitter.com/ZPPv5qZ1Qv
लक्ष्य सेन आणि व्हिक्टर एक्सेलसेन यांच्यातील हा सहावा सामना होता. यापैकी पाचवेळा व्हिक्टरनं बाजी मारली आहे. फक्त एक वेळा सेन विजयी झाला आहे. भारतीय पुरूष बॅडमिंटनपटूंमध्ये तब्बल 21 वर्षांनी लक्ष्यनं या स्पर्धेची फायनल गाठली होती. पण 21 वर्षांनी विजेतेपद मिळवण्याचं भारतीयांचं स्वप्न यंदाही अपूर्ण राहिलं आहे. All England Championship : इंग्लंडमध्ये 20 व्या वर्षी इतिहास रचणारा लक्ष्य सेन कोण आहे? भारताकडून यापूर्वी फक्त प्रकाश पदुकोण यांनी 1980 साली आणि पुलेला गोपीचंद यांनी 2001 साली ही स्पर्धा जिंकली होती. लक्ष्य सेननं यावर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल जिंकले होते.