दक्षिण आफ्रिकेचा विकेट-कीपर बॅट्समन क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) याने इतिहास घडवला आहे. आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये डिकॉकने शतक केलं. 91 बॉलमध्ये त्याने 122 रनची खेळी केली, यात 5 सिक्स आणि 11 फोरचा समावेश होता. या सामन्यात डिकॉकचा स्ट्राईक रेट 131.87 चा होता.
आपल्या वादळी शतकासोबतच डिकॉकने गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकलं. डिकॉक सगळ्यात जलद 16 वनडे शतकं करणारा विकेट कीपर बनला आहे. यासाठी त्याला 124 वनडे इनिंग लागल्या.
वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 16 वनडे शतक करण्याचा विक्रम हाशीम आमलाच्या (Hashim Amla) नावावर आहे. त्याने फक्त 94 इनिंगमध्येच हा कारनामा केला. विराट कोहली (Virat Kohli) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांना 16 वनडे शतकं करायला 110 इनिंग लागल्या. फिंचने (Aron Finch) 116 इनिंगमध्ये 16 शतकं केली.
क्विंटन डिकॉकने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रनचा टप्पाही ओलांडला. 259 इनिंगमध्ये त्याने 10 हजार रन पूर्ण केले. याचसोबत तो सगळ्यात जलद 10 हजार रन करणारा विकेट कीपरही झाला आहे.
डिकॉक 10 हजार रन पूर्ण करणारा सगळ्यात युवा विकेट कीपरही ठरला आहे. 28 वर्ष 211 दिवसांचा असताना त्याने हे रेकॉर्ड केलं. धोनीने 30 वर्ष 99 दिवसांमध्ये केलेलं हे रेकॉर्ड डिकॉकने मोडलं.
डिकॉक वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या विकेट कीपरमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कुमार संगकारा 23 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर डिकॉक आणि गिलख्रिस्ट 16-16 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. डिव्हिलियर्स, धोनी आणि शाय होप यांनी विकेट कीपर म्हणून 10-10 शतकं केली आहेत.
डिकॉक दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक वनडे शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून हाशीम आमलाने सर्वाधिक 27 शतकं, एबी डिव्हिलियर्सने 25, हर्षल गिब्सने 21 शतकं केली, तर जॅक कॅलिसच्या नावावर 17 वनडे शतकं आहेत.