मुंबई, 27 मे : आयपीएल 2023 मध्ये क्वालिफायर 2 सामन्यात शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गुजरात टायटन्सने आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. शुभमन गिलचं हे यंदाच्या आय़पीएल हंगामातलं तिसरं शतक आहे. गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 233 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मोहित शर्माने 5 विकेट घेत मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. या सामन्यात मुंबईचा 62 धावांनी पराभव झाला.
शुभमन गिलच्या शतकी खेळीचं कौतुक सध्या सोशल मीडियावर होत आहे. दरम्यान, शुभमन गिल आणि मुंबई इंडियन्सचा मेंटॉर असलेल्या सचिन तेंडुलकर यांचा चर्चा करत असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शुभमन गिलने शतक केल्यानंतर डगआऊटमध्ये सचिनसोबत बोलत असतानाचा हा फोटो आहे. याशिवाय सचिन शुभमनच्या कानात बोलत असलेलाही एक फोटो व्हायरल होतोय. यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
IPL 2023 : लिलावात मिळाले 50 लाख, एकटा मुंबईवर पडला भारी; 14 चेंडूत फिरवली मॅच
Shubman Gill with Sachin Tendulkar. pic.twitter.com/Tk5Y2aImE4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 26, 2023
व्हायरल होत असलेल्या फोटोत सचिन तेंडुलकर शुभमन गिलला सल्ला देताना दिसतोय असं काही चाहत्यांनी म्हटलंय. क्रिकेट विश्वात किंग कोहलीनंतर आता शुभमन गिलला प्रिन्स गिल असंही नाव चाहत्यांनी दिलंय. क्रिकेटचा देव आणि प्रिन्स एकाच फ्रेममध्ये दिसतायत असं म्हणत हा बेस्ट फोटो असल्याचंही चाहत्यांनी म्हटलं.
सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 233 धावा केल्या. यानंतर मुंबईचा डाव 171 धावात गुंडाळला. गिलने यंदाच्या आयपीएलमध्ये तिसरं शतक झळकावलं. शुभमन गिलने 60 चेंडूत 129 धावा केल्या. यात 10 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. आयपीएलच्या एका हंगामात दोनपेक्षा जास्त शतके करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. एका हंगामात सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहली आणि जोस बटलर यांच्या नावावर आहे. दोघांनी एका हंगामात प्रत्येकी चार शतके केली आहेत.
IPL 2023 : शुभमनचा कॅच, फलंदाजी क्रम अन् खेळाडुंच्या दुखापतीने मुंबईला पराभवाची 'जखम'
मुंबई इंडियन्सकडून खेळताना फक्त सूर्यकुमार यादवने फटकेबाजी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. त्याने 38 चेंडूत 61 धावा केल्या. याशिवाय तिलक वर्माने 14 चेंडूत 43 धावांची वेगवान खेळी केली. पण तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव बाद होताच मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023