मुंबई, 26 फेब्रुवारी : भारताचा स्टार क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर उद्या विवाह बंधनात अडकणार आहे. 27 फेब्रुवारीला शार्दूल ठाकूर त्याची मैत्रीण मिताली परुळकर सोबत लग्न करणार असून सध्या त्यांच्या विवाहातील कार्यक्रमांची धामधूम सुरु आहे. काल शार्दुलच्या हळदी समारंभाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात तो कुटुंबासोबत झिंगाट गाण्यावर थिरकताना दिसला. तर आज त्याच्या संगीत कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. शार्दूल ठाकूर याचा विवाह कर्जत येथील एका फार्महाउस वर होणार असून याला दोघांच्या कुटुंबातील 200 ते 250 जण उपस्थित राहणार आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 मार्च पासून तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. कसोटी संघात भारतीय संघाचा भाग असणाऱ्या श्रेयस अय्यरने व्यस्त शेड्युल मधून वेळ काढत शार्दुलच्या संगीत कार्यक्रमाला हजेरी लावली.
शार्दूल आणि मितालीच्या संगीत कार्यक्रमात श्रेयस अय्यर आणि शार्दूल तसेच त्याच्या मित्रांनी ‘यारो दोस्ती बडी हसीन हे’ हे गाणं गायलं. तसेच यावेळी शार्दूल ठाकूरने होणारी पत्नी मिताली सोबत ‘केसरीया’ गाण्यावर डान्स केला. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.