मुंबई, 13 मार्च : भारतीय संघावरील दुखापतीने ग्रहण काही जाण्याचं नाव घेत नाही. जसप्रीत बुमराहनंतर आता भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरची दुखापत त्याची पाठ सोडत नाही. श्रेयस सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त असून रविवारी अहमदाबाद येथे झालेल्या कसोटी सामन्यातून त्याने अचानकपणे माघार घेतली. त्याच्या अनुपस्थितीमुळे भारताला 1 विकेट शिल्लक असताना देखील फलंदाजीचा खेळ थांबवावा लागला. अशातच आता श्रेयस अय्यर हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेलाही मुकणार असल्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरने काल अचानकपणे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली यावेळी बीसीसीआयने यावर स्पष्टीकरण देत, चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसानंतर अय्यरचीपाठीची दुखापत उद्भवल्याचे सांगितले. तसेच त्याला रविवारी स्कॅनिंगसाठी पाठवण्यात आले होते . सध्या बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे.
काही दिवसांपूर्वी देखील श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. परंतु नंतर स्वस्थ झाल्याचे सांगून त्याने पुन्हा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत पुनरागमन केले होते. मात्र आता पुन्हा श्रेयस अय्यरची दुखापत बळावल्यामुळे तो १७ मार्च पासून सुरु जाणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला देखील मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोणता खेळाडू करणार श्रेयस अय्यरला रिप्लेस ? श्रेयस अय्यरचे पाठीचे दुखणे बळावून जर का तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकला नाही, तर संजू सॅमसन, दीपक हुडा, रजत पाटीदार हे खेळाडू श्रेयस अय्यरल रिप्लेस करण्याची शक्यता आहे.