मेलबर्न, 9 मार्च : ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne Death) याचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं. शुक्रवार 4 मार्चला हृदयविकाराच्या धक्क्याने वॉर्नचा मृत्यू झाला. शेन वॉर्न मित्रांसोबत थायलंडला सुट्टीसाठी गेला होता, तेव्हा तिथल्या व्हिलामध्येच त्याने अखेरचा श्वास घेतला, यानंतर अजूनही क्रिकेटपटू आणि क्रिकेट चाहते धक्क्यात आहेत. शेन वॉर्नच्या जवळच्या मित्राने त्याच्या अखेरच्या क्षणांचा फोटो शेयर केला आहे. वॉर्नचा मित्र थॉमस हॉल (Thomas Hall) हा द स्पोर्टिंग न्यूजचा सीईओ आहे. हॉलने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला. हा फोटो वॉर्नचा अखेरचा फोटो असल्याचं सांगण्यात येत आहे. थॉमस हॉलही वॉर्नसोबत थायलंडमध्ये फिरण्यासाठी गेला होता. त्यादिवशी नेमकं काय झालं याबाबत हॉलने त्याच्या वेबसाईटवर लिहिलं आहे. ‘काहीही वेगळं नव्हतं. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची पहिली टेस्ट थायलंडमध्ये कशी बघता येईल, हा प्रश्न आम्हाला पडला होता. वॉर्न आणि क्रिकेट कधीच दूर नव्हते. मॅच सुरू झाल्यानंतर वॉर्नने उडी मारली आणि तो त्याच्या रूममध्ये गेला. थोड्यावेळानंतर तो खूप कपडे घेऊन आला,’ असं हॉल म्हणाला.
‘वॉर्न मागच्या एका वर्षापासून माझ्यासोबत द स्पोर्टिंग न्यूजमध्ये आहे. त्याने मला 2005 ऍशेस टेस्टचा जम्पर, 2008 आयपीएल टी-शर्ट, वनडे टी-शर्ट आणि टोपी भेट दिली होती. हे सगळं आमच्या ऑस्ट्रेलिया आणि यूके ऑफिसमध्ये आहे,’ असं हॉलने सांगितलं. ‘माझी आणि शेन वॉर्नची मैत्री 15 वर्षांपासूनची आहे. 15 वर्षांपूर्वी आम्ही एका चॅरिटी पोकर स्पर्धेत भेटलो होतो. नेमकं का ते माहिती नाही, पण आम्ही पक्के मित्र झालो आणि संपूर्ण जग एकत्र फिरायला लागलो. आमची कुटुंबही भेटली आणि आम्ही सुंदर वेळ घालवला,’ अशी भावनिक आठवण हॉलने सांगितली.