मुंबई, 21 डिसेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या आणखी एका मित्राचं कोरोना व्हायरसमुळे निधन झालं आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी याच्यासोबत क्रिकेट खेळणाऱ्या विजय शिर्के (Vijay Shirke) यांनी शनिवारी कोरोनामुळे अखेरचा श्वास घेतला. विजय शिर्के 80च्या दशकात सनग्रेस मफतलालकडून खेळलेल. या टीममध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीही खेळले होते. विजय शिर्के हे फास्ट बॉलर होते. त्यांनी ठाण्याच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 57 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
ऑक्टोबर महिन्यात सचिनचा आणखी एक मित्र अवी कदम याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आता विजय शिर्केंच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटचं नुकसान झालं आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार विजय शिर्के काहीवर्षांपूर्वी ठाण्यात राहायला आले. कोरोनामधून ते बरे झाले होते, पण अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला, असं त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितलं.
Extremely sad after knowing the sad demise of Vijay Shirke. His contribution in my early life has been invaluable. Much strength to his family and may his soul rest in peace pic.twitter.com/dK2jghztz7
— Vinod Kambli (@vinodkambli349) December 20, 2020
विजय शिर्के यांनी मुंबई अंडर-17 कॅम्पचं दोन वर्ष कोचिंगही केलं आहे. मुंबईच्या अनेक क्रिकेटपटूंनी त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे. शिर्के यांच्यासोबत क्रिकेट खेळलेला विनोद कांबळी म्हणाला, 'ही दु:खद बातमी आहे, माझ्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्यांचं योगदान अमूल्य होतं. हॅरिस शिल्डमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड पार्टनरशीप केल्यानंतर मला आणि सचिनला सनग्रेस मफतलाल टीममध्ये घेण्यात आलं होतं. आमचे कर्णधार संदीप पाटील होते आणि विजय शिर्केही त्या टीममध्ये होते. तिकडेच आमची मैत्री झाली, तो चांगला बॉलर होता. तो नेहमीच सगळ्यांना मदत करायचा.' भारताचा माजी फास्ट बॉलर सलिल अंकोला यानेही शिर्के यांच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.