मुंबई, 8 जून : भारतीय क्रिकेट संघात रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (IND vs AUS WTC Final 2023) भारतीय चाहत्यांना या शिलेदारांकडून खूप आशा होत्या, पण ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या प्रतिष्ठेच्या फायनलच्या दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाच्या वाघांनी सपशेल शरणागती पत्करल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता हा कसोटी सामना वाचवणे भारतासाठी कठीण होत चालले आहे. ज्या खेळपट्टीवर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार शतके झळकावली, त्या खेळपट्टीवर भारताचे स्टार फलंदाज धावांसाठी आसुसलेले दिसले. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या 4 विकेट 71 च्या स्कोअरवर पडल्या होत्या. रोहितपासून विराटपर्यंत सगळेच ऑस्ट्रेलियन वेगवान आक्रमणासमोर झुंजताना दिसले. कांगारू गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना ऑफ स्टंपवर टाकून आपल्या जाळ्यात अडकवले. रोहित 15 धावा करून बाद झाला तर गिलने 13 धावा केल्या. पुजारा आणि विराट 14-14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. रोहितला समोरचा गुड लेंथ बॉल खेळायचा होता पण चेंडू खाली राहिला अन् पॅडला लागला. इनस्विंग बॉलवर गिलला बोलंडने झेलबाद केले, तर पुजाराला ग्रीनचा आतमध्ये येणाका बॉल समजू शकला नाही, तर कोहली स्टार्कच्या बाउन्सरमध्ये अडकला. अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या रवींद्र जडेजाला ऑफस्पिनर नॅथन लॉयनला आपल्या फिरकीत पायचीत करत टीम इंडियाची धावसंख्या 5 विकेटच्या मोबदल्यात 142 अशी केली. जडेजाचे अर्धशतक 2 धावांनी हुकले. त्याने रहाणेसह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि दोघांनी पाचव्या विकेटसाठी 71 धावा जोडल्या पण जडेजाला लॉयनने त्याच्या फिरकीत पायचीत करून ही मजबूत दिसणारी भागीदारी तोडली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणे 29 आणि यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरत 5 धावांवर नाबाद परतले. तिसरा दिवस दोन्ही फलंदाजांसाठी महत्त्वाचा असणार आहे. ही खेळपट्टी तिसऱ्या दिवशीही वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल राहू शकते. स्टंपपर्यंत टीम इंडियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा केल्या होत्या. कांगारू संघाच्या पहिल्या डावात भारत अजूनही 318 धावांनी मागे आहे. 30 च्या स्कोअरवर रोहित आणि गिलच्या विकेट पडल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या खांद्यावर चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी होती. पण रोहितने संघाची धावसंख्या 30 असताना गिलची साथ सोडली. पॅट कमिन्सने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. या स्कोअरवर गिलही स्कॉट बोलँडचा बळी ठरला. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्यावर डाव सांभाळण्याची जबाबदारी होती. पण त्यांनीही निराशा केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, बोलँड आणि कॅमेरून ग्रीन यांनी 1-1 विकेट घेतली. वाचा - WTC Final : ‘सिनियर खेळाडूंचा आदर करणं शिक’ त्या कृतीवरून नेटकऱ्यांनी मोहम्मद सिराजला झापलं ऑस्ट्रेलियाने 108 धावांत 8 विकेट गमावल्या ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे तर त्यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात 327/3 अशी केली. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. विशेषत: वेगवान गोलंदाज सिराज ज्याने 4 बळी घेतले. कांगारू संघाने 108 धावा करत 8 विकेट गमावल्या. मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी 2-2 बळी घेतले. एकवेळ ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेटवर 361 धावा होत्या आणि कांगारू संघ 500 धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांना 469 धावांत रोखले. स्मिथने चौकारांसह पूर्ण केले शतक ऑस्ट्रेलियाने त्यांच्या कालच्या म्हणजेच पहिल्या दिवसाच्या स्कोअरमध्ये आणखी 142 धावा जोडून उर्वरित 7 विकेट गमावल्या. मोहम्मद सिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला ज्याने 108 धावांत 4 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने 174 चेंडूत 163 तर स्मिथने 268 चेंडूत 121 धावा केल्या. स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 31वे शतक झळकावले. दिवसाच्या पहिल्याच षटकात सिराजच्या सलग दोन चौकारांसह स्मिथने इंग्लंडमधील आपले 7वे आणि या मैदानावरील तिसरे शतक पूर्ण केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.