रायपूर, 18 मार्च : रायपूरमध्ये सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) क्रिकेट रसिकांना त्यांच्या जुन्या क्रिकेट हिरोजना पुन्हा एकदा मैदानात बघण्याची संधी मिळत आहे. सचिन तेंडुलकर, सेहवाग, युवराज सिंग यांच्यासारख्या भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंसह चाहत्यांना जगातल्या दिग्गज खेळाडूंनाही पाहता येत आहे. या सीरिजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका लिजेंडसने बांगलादेश लिजेंड्सचा (South Africa Legends vs Bangladesh Legends) 10 विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेचे ओपनर एन्ड्र्यू पुटिक आणि मॉर्ने वॅन वेक यांनी बांगलादेशच्या बॉलरना एकही संधी दिली नाही. 161 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. वॅन वेक आणि पुटिक यांनी नाबाद अर्धशतकी खेळी केली. पुटिकने 54 बॉलमध्ये 82 रन केले, यात 9 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता, तर वॅन वॅकने 62 बॉलमध्ये नाबाद 69 रन केले. पहिल्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा कर्णधार जॉन्टी ऱ्होड्सने (Jonty Rhodes) भन्नाट रन आऊट करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. जॉन्टीच्या या रन आऊटमुळे चाहत्यांसमोर जुन्या आठवणी लगेच उभ्या राहिल्या. चौथ्या ओव्हरमध्ये मखाया एनटिनीच्या बॉलिंगवर जॉन्टीने रन आऊट केला. मखायाच्या बॉलिंगवर बांगलादेशच्या मेहरब हुसेनने पॉईंटच्या दिशेने बॉल मारला आणि तो रन काढायला धावला, पण तिकडे उभ्या असलेल्या जॉन्टीने डायरेक्ट हिट मारत हुसेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
🌟 HIGHLIGHTS: #BANLvsSAL
— Road Safety World Series (@RSWorldSeries) March 16, 2021
A memorable final match for the #BangladeshLegends against #SouthAfricaLegends
Catch the @Unacademy Road Safety World Series action tonight at 7pm. #YehJungHaiLegendary
Watch LIVE only on @Colors_Cineplex, #RishteyCineplex and for free on @justvoot pic.twitter.com/22SCWGuKd3
हुसेनची विकेट गेल्यानंतर बांगलादेशला ठराविक अंतराने धक्के लागले, त्यामुळे त्यांना 20 ओव्हरमध्ये फक्त 160/9 पर्यंत मजल मारता आली. ओपनर नझिमुद्दीन याने 32 रन तर मधल्या फळीत आफताब अहमदने 39 रन आणि हनन सरकारने 36 रन केले. दक्षिण आफ्रिकेकडून एनटिनी आणि थंडी शबालाला यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. आता आज दक्षिण आफ्रिका लिजेंड्स आणि श्रीलंका लिजेंड्स यांच्यात दुसरी सेमी फायनल होणार आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये इंडिया लिजेंड्सने वेस्ट इंडिज लिजेंड्सचा पराभव करत फायनल स्पर्धा गाठली. आता फायनलमध्ये भारताची गाठ कोणाशी पडेल, याचा निकाल आज लागेल.