मुंबई, 5 मार्च : भारतीय क्रिकेटमध्ये पठाण ब्रदर्स म्हणून लोकप्रिय असलेले इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) निवृत्तीनंतर पुन्हा भारतीय टीमकडून खेळणार आहे. काहीच दिवसांपूर्वी युसूफ पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता हे दोघं भाऊ रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Saftey World Series) भारतीय टीमचं प्रतिनिधीत्व करतील. इरफान पठाणने युसूफसोबतचा निळ्या जर्सीमधला एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. निवृत्तीनंतरचा फोटो, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता या वर्षी या सीरिजला 5 मार्चपासून सुरूवात होणार आहे. 2020 साली ही स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे 4 मॅचनंतर रद्द करण्यात आली. या वर्षी ही स्पर्धा छत्तीसगडच्या रायपूरमध्ये खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन लिजेंड्स प्रवासाच्या निर्बंधांमुळे या स्पर्धेत खेळणार नाहीत. सहा टीमच्या या स्पर्धेत इंग्लंड लिजेंड्स आणि बांगलादेश लिजेंड्स नावाच्या दोन नव्या टीम जोडल्या गेल्या आहेत. इंग्लंडचा माजी खेळाडू केव्हिन पीटरसन इंग्लंडचा तर मोहम्मद रफीक बांगलादेशचं नेतृत्व करेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा नमन ओझा, वियन कुमार आणि युसूफ पठाण भारतीय लिजेंड्स कडून खेळणार आहेत. या टीममध्ये सेहवाग, युवराज, मोहम्मद कैफही आहेत, तर टीमचं नेतृत्तव सचिन तेंडुलकर करणार आहे. ब्रायन लारा वेस्ट इंडिजचा, जॉन्टी ऱ्होड्स दक्षिण आफ्रिकेचा आणि तिलकरत्ने दिलशान श्रीलंकेचा कर्णधार असेल.