नागपूर, 10 फेब्रुवारी : भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजाने नागपूर कसोटीत पहिल्या डावात गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज बाद केले. त्यानंतर फलंदाजी करताना अर्धशतक केलं असून तो दुसऱ्या दिवसअखेर नाबाद राहिला आहे. जडेजाने सहा महिन्यांनी कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. जुलै 2022 मध्ये तो याआधीचा सामना खेळला होता. नागपूर कसोटीत त्याने 22 षटके गोलंदाजी केली. यात 8 षटके निर्धाव टाकत त्याने 47 धावा दिल्या आणि 5 गडी बाद केले. गेल्या वेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारतात कसोटी मालिका खेळली होती तेव्हा जडेजा विकेट घेणारा प्रमुख खेळाडू होता. आता दुखापतीनंतर त्याने पुन्हा जोमाने पुनरागमन केले आहे. हेही वाचा : जडेजाने हे काय केलं? ऑस्ट्रेलियन मीडिया अन् खेळाडूंनी विचारला प्रश्न; पाहा VIDEO पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बोलताना जडेजा म्हणाला की, पाच महिन्यांनी खेळणे तेसुद्धा कसोटी खेळणं कठीण आहे. मी यासाठी तयार होतो आणि फिटनेससोबत एनसीएमध्ये माझ्या कौशल्यावर कष्ट करत होतो. बऱ्याच काळानंतर प्रथम श्रेणीत रणजी ट्रॉफीत खेळलो आणि जवळपास ४२ षटके गोलंदाजी केली. त्यामुळे मला इथं येण्यासाठी आणि कसोटी खेळण्यासाठी खूप आत्मविश्वास मिळाला. एनसीएत असताना कसोटीसाठी फिट व्हायला अनेक तास गोलंदाजी करत असल्याचंही जडेजाने सांगितलं. तो म्हणाला की, मी बंगळुरुत एनसीएमध्ये होतो तेव्हा गोलंदाजीसाठी घाम गाळत होतो. दररोज 10-12 तास गोलंदाजी करायचो. यामुळे मला खूप मदत झाली. पाच महिन्यांनी कसोटी खेळताना मी दुखापतीचा विचार करत नव्हतो, मी फक्त चांगलं खेळावं इतकीच इच्छा होती. हेही वाचा : फलंदाजांना नाचवणाऱ्या खेळपट्टीवर हिटमॅनचं शतक, शतकानंतर स्टीव्ह स्मिथनेही दिली दाद नागपूरच्या खेळपट्टीबाबतही रविंद्र जडेजा बोलला. तो म्हणाला की, खेळपट्टी उसळणारी नव्हती. मी स्टम्प टू स्टम्प लाइनला टार्गेट करत होतो. एखादा चेंडू वळायचा तर एखादा थेट जायचा. डावखुरा असल्यानं जर तुम्हाला फलंदाजाला यष्टीमागे कॅच किंवा यष्टीचित करता तेव्हा याचं श्रेय चेंडूला जातं. कसोटीत विकेट मिळते तेव्हा तुम्हाला आनंदच होतो असंही त्याने म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.