अहमदाबाद, 13 जानेवारी : भारतात घरेलू क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळायला गेलेल्या क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. हिमाचल प्रदेशचा युवा क्रिकेटपटू सिद्धार्थ शर्मा गुरुवारी रणजी ट्रॉफीच्या सामन्यासाठी गुजरातला गेला होता. मात्र तिथे तो आजारी पडला आणि रात्री नऊच्या सुमारास त्याचं निधन झालं.
सिद्धार्थ शर्मा दोन आठवड्यापूर्वी व्हेंटिलेटरवर होता असंही सांगितलं जात आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयानेसुद्धा वेगवान गोलंदाज सिद्धार्थचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. सिद्धार्थ शर्मा अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता तेव्हा त्याने सामन्याच्या पहिल्या डावात ५ गडी बाद केले होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे रुग्णालयातही दाखल केले होते. वडोदरामध्ये रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा : हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी सुरुवात; स्पेनला 2-0ने नमवले
हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ,मुख्यमंत्री सुखविंद्र सिंह सुखू यांनी हिमाचलच्या विजय हजारे ट्रॉफी विजेत्या संघातील सदस्य आणि स्टार वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्माच्या निधनावर शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी सिद्धार्थच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त केल्या.
उना इथं जन्मलेल्या सिद्धार्थचं घरेलू क्रिकेटमधलं करिअर अवघ्या पाच वर्षांचं होतं. त्याने एका टी२० सामन्यासह ६ प्रथम श्रेणीचे सामने खेळले होते. ६ लिस्ट ए सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने अखेरचा सामना बंगालविरुद्ध कोलकात्यातील इडन गार्डन्सवर खेळला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Ranji Trophy