
पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी (2 जानेवारी) निधन झालं.

आरचरेक सरांना पद्मश्रीने गौरवण्यात आलं होतं. शिवाय क्रीडा प्रशिक्षकांसाठी देण्यात येणारा द्रोणाचार्य पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला होता.

आचरेकरांनी फक्त या दोन खेळाडूंनाच घडवले असे नाही तर भारतीय क्रिकेट संघातील अनेक माजी खेळाडूंचे ते द्रोणाचार्य आहेत. आचरेकरांनी अनेक नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज भारतीय संघाला दिले.

रामनाथ पारकर- रामनाथ हे राईट हँडेड बॅट्समन होते. त्यांनी १९७२-७३ मध्ये इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. ते मुंबईकडून रणजी सामनेही खेळायचे. त्यांनी ८५ फर्स्ट क्लास सामने खेळले.

बलविंदर सिंग संधू- भारताचे ते मध्यम वेगवान गोलंदाज होते. त्यांनी ८ कसोटी सामने आणि २२ एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी अनेक महत्त्वाच्या सामन्यात फलंदाजीही केली.

प्रवीण आम्रे- प्रवीण हे भारताचे राईट हँडेड बॅट्समन होते. १९९१ ते १९९९ या कालावधीत प्रवीण यांनी भारतासाठी ११ कसोटी सामने आणि ३७ एकदिवसीय सामने खेळले.

चंद्रकांत पंडित- चंद्रकांत हे भारताचे यष्टीरक्षक आणि राईट हँडेड बॅट्समन होते. त्यांनी १९८६ ते १९९२ या कालवधीत भारताचे प्रतिनिधीत्व केले. या काळात त्यांनी ५ कसोटी सामने आणि ३६ एकदिवसीय सामने खेळले.

लालचंद राजपूत- लालचंद हे भारताचे राईट हँडेड बॅट्समन होते. ते झिंबाब्वेचे प्रशिक्षकही होते. आचरेकरांनी लालचंद यांना फलंदाजीचे धडे दिले. १९८५ ८७ मध्ये राजपुत यांनी भारतासाठी २ कसोटी सामने आणि ४ एकदिवसीय सामने खेळले.

समीर दिघे- समीर हे भारताचे यष्टीरक्षक आणि राईट हँडेड बॅट्समन होते. त्यांनी भारतासाठी ६ कसोटी सामने आणि २३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांनी भारतीय संघात पदार्पण केलं होतं.

संजय बांगर- हे नाव वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरंय. रमाकांत आचरेकर यांनी संजयलाही क्रिकेटचं प्रशिक्षण दिलंय. २०१४ पासून संजय भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक (बॅटिंग) आहे. संजयने भारतासाठी १४ कसोटी सामने आणि १५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

अजित आगरकर- फार कमी लोकांना माहीत आहे की, आचरेकरांनी अजितलाही क्रिकेटचे धडे दिले आहेत. अजितने २०० सामन्यांहून जास्त सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय संघात तो तेज गोलंदाजी करायचा. आतापर्यंत त्याने २६ कसोटी सामन्यात, १९१ एकदिवसीय सामन्यात आणि ४ टी२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

विनोद कांबळी- हे नाव लोकांना नवं नाही. विनोद आणि सचिनच्या जोडीने रमाकांत आचरेकरांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. या जोडगोळीमुळे त्यांची अनन्यसाधारण कामगिरी लोकांच्या समोर आली. विनोदने भारताचे लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणून प्रतिनिधित्व केले. त्याने भारतासाठी १७ कसोटी सामने आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले.

रमेश पोवार- सध्या मिताली राजच्या वादामुळे चर्चेत असलेल्या रमेशलाही रमाकांत आचरेकरांनी प्रशिक्षण दिले आहे. रमेशने २ कसोटी सामन्यात आणि ३१ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

सचिन तेंडुलकर- या नावातच सारं काही आलं. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिनने खऱ्या अर्थाने गुरूचे ऋण फेडले असे म्हणावे लागेल. अजूनही आपल्या व्यग्र वेळापत्रकातून सचिन वेळात वेळ काढून आचरेकरांना भेटायला जातो.




