बँगलोर, 10 मे : भाजप युवा मोर्चाच्या बैठकीला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid BJP) हजेरी लावेल, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. यावर्षी निवडणुका होणाऱ्या हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) या आठवड्यात भाजपच्या युवा मोर्चाची ही बैठक होणार आहे, पण याबाबत येत असलेलं वृत्त चुकीचं असल्याचं उत्तर खुद्ध राहुल द्रविडने दिलं आहे. 'काही माध्यमांनी हिमाचल प्रदेशमध्ये 12-15 मे 2022 या कालावधीमध्ये हिमाचल प्रदेशला होणाऱ्या बैठकीत मी उपस्थित राहणार असल्याच्या बातम्या दिल्या, पण हे वृत्त चुकीचं आहे,' असं द्रविड एएनआयशी बोलताना म्हणाला.
हिमाचल प्रदेशच्या धर्मशालाचे भाजप आमदार विशाल नेहेरिया यांनी आज सकाळी भाजप युवा मोर्चाच्या बैठकीला राहुल द्रविड उपस्थित राहिल, असं वक्तव्य केलं होतं. द्रविडच्या उपस्थितीमुळे फक्त राजकारणच नाही तर इतर क्षेत्रांमध्येही पुढे जाता येतं, असा संदेश तरुणांमध्ये जाईल, असं विशाल नेहेरिया म्हणाले होते.
'भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 12 मे ते 15 मे दरम्यान होणार आहे. या बैठकीत हिमाचल प्रदेशचे नेतेही सहभागी होणार आहेत. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्रीही अधिवेशनासाठी येतील. याशिवाय भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडही या बैठकीमध्ये सहभागी होईल. द्रविडचं यश बघता तरुणांना राजकारणाशिवाय इतर क्षेत्रांमध्येही पुढे जाण्याचा संदेश मिळेल,' अशी प्रतिक्रिया विशाल नेहेरिया यांनी दिली. राहुल द्रविड याने मात्र यात कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं.
इसमें भारतीय किक्रेटर राहुल द्रविड भी शामिल होंगे। उनकी सफलता को लेकर युवाओं में एक संदेश दिया जाएगा कि राजनीति ही नहीं अन्य क्षेत्रों में भी हम आगे बढ़ सकते हैं: विशाल नहेरिया, विधायक, धर्मशाला, हिमाचल प्रदेश (9.5)
— ANI_HindiNews (@AHindinews) May 10, 2022
हिमाचल प्रदेशमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, मणीपूर आणि उत्तराखंडमध्ये मिळालेल्या यशानंतर आता हिमाचल प्रदेशमध्येही पुन्हा एकदा कमळ फुलवण्याची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Rahul dravid