मुंबई, 10 मार्च : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या अहमदाबाद येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. कसोटी क्रिकेटच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांचा घाम काढला. दुसऱ्या दिवशी देखील ऑस्ट्रेलियाने चांगली फलंदाजी करून 480 धावांचा डोंगर उभा केला. परंतु याच दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या रन मशीन रोखण्यात भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याला यश आले. यासह अश्विनने या सामन्यात 6 विकेट्स घेऊन मोठा विक्रम रचला. ऑस्ट्रेलियाच्या दमदार फलंदाजी समोर भारताचे सर्व गोलंदाज फेल ठरत असताना आर अश्विन मात्र त्यांना शेवटपर्यंत भिडला. त्याने फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर देखील 50 षटके गोलंदाजी करत फक्त 90 धावा देत 6 विकेट घातल्या. अश्विनने या दमदार कामगिरीसोबतच दोन विक्रम केले. आयसीसी कसोटी रँकिंगमधील अव्वल स्थानावर असलेला गोलंदाज आर. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 32 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याने या सोबतच भारताचे दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा मायदेशात 25 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम देखील तोडला. अश्विनने बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली. आता अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा लायन हे दोघे प्रत्येकी 113 विकेट्स घेत बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.