अबूधाबी, 16 जून : पाकिस्तानी खेळाडूंचे एकमेकांशी असलेले वाद क्रिकेट रसिकांनी अनेकवेळा पाहिले आणि ऐकले असतील, पण पीएसएलमध्ये (PSL) पाकिस्तानच्या दोन क्रिकेटपटूंनी मैदानातच एकमेकांशी पंगा घेतला. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) या दोघांचं पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स आणि क्वेट्टा ग्लॅडिएटर्स (Lahore Qualandars vs Quetta Gladiators) यांच्यातल्या सामन्यात भांडण झालं. ग्लॅडिएटर्सची बॅटिंग सुरू असताना 19 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली जेव्हा शाहीन आफ्रिदीने सरफराजला बाऊन्सर टाकला. हा बाऊन्सर सरफराजच्या हेल्मेटला लागला आणि अंपायरने नो बॉल दिला.
सरफराजच्या हेल्मेटला लागलेला बॉल थर्ड मॅनच्या दिशेला गेला, यानंतर त्याने आणि हसन खानने एक रन काढली. नॉन स्ट्रायकर एण्डला आल्यानंतर सरफराज शाहीनला काहीतरी म्हणाला, यानंतर शाहीन आफ्रिदी भडकला. एवढच नाही तर त्याने सरफराजच्या जवळ जाऊन प्रतिक्रियाही दिली.
शाहीन आफ्रिदी सरफराजच्या जवळ जात असतानाच अंपायर मध्यस्ती करण्यासाठी आले, त्याचवेळी कलंदर्सचा मोहम्मद हाफीज आणि कर्णधार सोहेल अख्तरही दोघांना शांत करण्यासाठी पुढे सरसावले. यानंतर सरफराजने झालेल्या वादाबद्दल अंपायरशी चर्चा केली.
Sarfaraz v Shaheen last night was good fun. Loved that there were emotions coming through. The young Turk not afraid to bounce a former captain. And absolutely no issues with them having words. Happens in sport. Spices things up #HBLPSL6 pic.twitter.com/xUIx1EAweI
— Hemant (@hemantbuch) June 16, 2021
सामना संपल्यानंतर शाहीन आफ्रिदीला या घटनेबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्याने खेळामध्ये अशा गोष्टी होतच असतात, अशी प्रतिक्रिया दिली. आफ्रिदीच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले. आफ्रिदीने आपल्या माजी कर्णधारासोबत असं वागायाला नको होतं, असं अनेक जण म्हणाले. तसंच वरिष्ठ खेळाडूंना मान देणं गरजेचं असल्याच्या प्रतिक्रियाही काहींनी दिल्या.
पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वसीम अक्रम यानेही काही दिवसांपूर्वी युवा खेळाडूंच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानच्या तरुण खेळाडूंनी ज्येष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षकांना योग्य सन्मान दिला पाहिजे, असं अक्रम म्हणाला होता.
पीएसएलच्या या सामन्यात सरफराजच्या ग्लॅडिएटर्सने कलंदर्सचा 18 रनने पराभव केला. जेक वेदरआल्डने ग्लॅडिएटर्ससाठी सर्वाधिक 48 रन केले, ज्यामुळे स्कोअर 158/5 पर्यंत पोहोचला. या आव्हानाचा पाठलाग करताना कलंदर्सचा 140 रनवर ऑल आऊट झाला. कलंदर्सकडून टीम डेव्हिडने 46 रन केले. आफ्रिदीने या सामन्यात 28 रन दिले, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही, तर सरफराज 34 रनवर नाबाद राहिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Pakistan