नवी दिल्ली, 28 मे : काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आज नवीन संसदेसमोर ‘महापंचायत’ आयोजित केली होती. मात्र, त्याआधीच पैलवान विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी फरफटत ताब्यात घेतले. यानंतर, सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल झाला, ज्यामध्ये विनेश आणि संगीता फोगट यांनी पोलीस व्हॅनमध्ये हसताना सेल्फी घेतलेला दिसत आहे. दरम्यान, हा फोटो मॉर्फ केलेला असल्याचे सांगत कुस्तीपटू बजरंग पुनियाने ‘आयटी सेलचे लोक हे खोटे फोटो पसरवत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी पुनियाने दुसरा फोटो पोस्ट करत आधीचा खोटा असल्याचे म्हटले आहे. बजरंग पुनियाने दोन फोटो ट्विट केले – एक मॉर्फ केलेला आणि दुसरा मूळ. यातील एका फोटोत विनेश आणि संगीता फोगटसह इतर काही कुस्तीपटू हसताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत ते खिन्न बसलेले आहेत. हे दोन्ही फोटो शेअर करत पुनियाने लिहिले की, ‘आयटी सेलचे लोक हे खोटे फोटो पसरवत आहेत. आम्ही हे स्पष्ट करतो की कोणीही हे बनावट फोटो पोस्ट करेल त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली जाईल.
IT Cell वाले ये झूठी तस्वीर फैला रहे हैं। हम ये साफ़ कर देते हैं की जो भी ये फ़र्ज़ी तस्वीर पोस्ट करेगा उसके ख़िलाफ़ शिकायत दर्ज की जाएगी। #WrestlersProtest pic.twitter.com/a0MngT1kUa
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) May 28, 2023
कुस्तीपटूंनी महिला महापंचायत बोलावली होती भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी देशातील हे अव्वल कुस्तीपटू जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. ब्रिज भूषण यांच्यावर एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. कुस्तीपटूंनी रविवारी नवीन संसद भवनासमोर महिलांची महापंचायत बोलावली होती, मात्र पोलिसांनी परवानगी दिली नाही. वाचा - PHOTOS : एकीकडे नव्या संसदेचे उद्घाटन; दुसरीकडे महिला पैलवानांना फरफटत टाकत होते गाडीत अशा परिस्थितीत नवीन संसद भवनापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंतरमंतरवर आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. पोलिसांनी कुस्तीपटूंना संसदेच्या दिशेने न जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, ते पुढे गेले त्यानंतर झटापट सुरू झाली. कुस्तीपटू आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. विनेश फोगट, तिची बहीण संगीता फोगट आणि साक्षी यांनी बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पैलवानांना जबरदस्तीने बसमध्ये बसवून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कुस्तीपटूंच्या खाटा, गाद्या, कुलर, पंखे, ताडपत्री छतासह इतर सामान काढून टाकले. ‘जंतरमंतर पूर्णपणे रिकामे करण्यात आले’ दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) दीपेंद्र पाठक यांनी दावा केला की आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी वारंवार विनंती आणि इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांशी झटापट झाली. आंदोलकांवर एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाठक म्हणाले, ‘आज आपल्या नवीन संसदेचे उद्घाटन होते. आपल्या देशासाठी हा एक महत्त्वाचा दिवस आणि अभिमानाचा क्षण होता. वारंवार इशारा व विनंती करूनही पैलवानांनी आमचे ऐकले नाही. त्यांचे वर्तन अत्यंत बेजबाबदार होते.’ ते म्हणाले, ‘आता त्यांचे जंतरमंतरवर धरणे चालू देणार नाही. जंतरमंतर पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. दुसरीकडे ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने जंतरमंतरवर आपला लढा सुरूच राहणार असल्याचे ट्विट केले आहे. ते म्हणाले, ‘आमचे आंदोलन संपलेले नाही. जंतरमंतरवर सत्याग्रह करू. या देशात हुकूमशाही चालणार नाही. महिला कुस्तीगीरांचा सत्याग्रह होणार आहे.