बँगलोर, 1 जानेवारी : प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League) युपी योद्धा आणि यू मुंबा (UP Yodha vs U Mumba) यांच्यातला रोमांचक सामना अखेर ड्रॉ झाला, पण या निकालामुळे यू मुंबा मात्र निराश झाली असेल, कारण सामन्याच्या सुरुवातीला यू मुंबाकडे मोठी आघाडी होती. दुसऱ्या हाफमध्ये यूपी योद्धाने शानदार कमबॅक करत सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू असलेल्या प्रदीप नरवालचा (Pradeep Narwal) फॉर्म युपी योद्धासाठी चिंतेचा विषय असेल. सेकंड हाफमध्ये प्रदीप नरवालला 10 मिनिटं बाहेर बसावं लागलं.
युपी योद्धा आणि यू मुंबा यांच्यातला हा सामना 28-28 ने बरोबरीमध्ये सुटला. पहिल्या हाफनंतर ब्रेक झाला तेव्हा यू मुंबा 16-12 ने पुढे होती, पण दुसऱ्या हाफमध्ये मुंबईने सामन्यावरची पकड गमावली. या सामन्यामध्ये यू मुंबाचा अजिथ कुमार (Ajith Kumar) पुन्हा एकदा यशस्वी ठरला. अजिथने मुंबईकडून सर्वाधिक 9 पॉईंट्स केले, यातले 6 रेड पॉईंट्स तर 3 बोनस पॉईंट्स होते. याशिवाय अभिषेक सिंग, रिंकू, राहुल सेठपाल यांनी प्रत्येकी 4-4 पॉईंट्स स्कोअर केले. मोहसेनला 3, हरेंद्र कुमारला 2 आणि फझेल अत्रचली आणि शिवम अनिल यांना प्रत्येकी 1-1 पॉईंट करण्यात यश आलं.
दुसरीकडे युपी योद्धाचा सुरेंद्र गिल सगळ्यात यशस्वी ठरला. सुरेंद्रने 8 पॉईंट्स केले, यात 6 रेड, 1 टॅकल आणि 1 बोनस पॉईंटचा समावेश होता. सुमितने 6 आणि प्रदीप नरवालने 4 पॉईंट्स केले. अशू सिंग, रोहित तोमर आणि अंकित यांना 2-2 पॉईंट्स करता आले. नितेश कुमारने एक पॉईंट केला.
पॉईंट्स टेबलमध्ये दबंग दिल्ली 18 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर तर यू मुंबा 17 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीने 4 पैकी 3 सामने जिंकले, तर 1 सामना ड्रॉ झाला. यू मुंबाने 5 पैकी 2 सामने जिंकले आणि 2 ड्रॉ झाले, एका मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pro kabaddi league