मुंबई, 1 डिसेंबर : येत्या 22 डिसेंबरपासून प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) (Pro Kabaddi League) (PKL) आठव्या सीझनला (Season 8) सुरुवात होणार आहे. खेळाडूंचे लिलाव पार पडले असून, आता सर्व 12 टीम सराव आणि रणनीती आखण्यात व्यग्र झाल्या आहेत. लिलावादरम्यान, सर्व फ्रँचायजींनी (Franchise) त्यांच्या टीम मॅनेजमेंटचा विचार केला आहे. त्यांनी शक्य तितक्या चांगल्या खेळाडूंची निवड करून एक समतोल टीम बनवण्याचा प्रयत्न करण्यावर भर दिलेला आहे. या वर्षी पीकेएल आयोजकांनी 'कारवा' फॉरमॅटला बगल देऊन सर्व सामने बेंगळुरूमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रो कबड्डी लीगमुळे तळागाळातल्या अनेक गुणी खेळाडूंना संधी मिळाली आहे. काही खेळाडू असे आहेत ज्यांनी सुरुवातीच्या काही सीझनमध्ये धडाकेबाज कामगिरी करूनही त्यांना सातव्या सीझनमध्ये खेळता आलं नव्हतं. असे खेळाडू या वर्षीच्या आठव्या सीझनमध्ये (PKL Season 8) दमदार पुनरागमन (comeback) करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
प्रो कबड्डीच्या आठव्या सीझनमध्ये सुरिंदर नाडा (हरियाणा स्टीलर्स), महेंद्र गणेश राजपूत (गुजरात जायंट्स) आणि संदीप कांडोला (तेलुगू टायटन्स) हे तीन प्रमुख खेळाडू पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
सुरिंदर नाडा (Surender Nada) (हरियाणा स्टीलर्स)
हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers) टीममधला सुरिंदर नाडा हा पीकेएलमधील सर्वोत्तम अँकल होल्ड स्पेशालिस्ट (ankle-hold specialist) म्हणून ओळखला जातो. लेफ्ट कॉर्नर डिफेन्समध्ये त्याचा हातखंडा आहे. त्यानं आपल्या एकूण कारकीर्दीत 200पेक्षा जास्त टॅकल पॉइंट्स (tackle points) मिळवलेले आहेत. त्यानं एकाच मोसमात सर्वाधिक सलग हाय-5 (5) करण्याचा विक्रम केला होता. खांद्याच्या दुखापतीमुळे सुरिंदर नाडा सीझन 6मधून बाहेर पडल्यानं हरयाणा स्टीलर्स टीमला मोठा धक्का बसला होता. एक डिफेन्डर म्हणून तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. तसंच मागच्या सीझनमध्ये त्यानं कॅप्टन म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली होती. 80 टॅकल पॉइंट्स मिळवून तो सीझन-5 चा सर्वोत्कृष्ट डिफेन्डर ठरला होता. त्याच्या कामगिरीच्या बळावर हरियाणा स्टीलर्स टीमने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. या वर्षीच्या सीझनमध्ये नाडाचं संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे राजेश नरवाल आणि रवी कुमार यांना डिफेन्समध्ये मोठा आधार मिळाला आहे.
महेंद्र गणेश राजपूत (गुजरात जायंट्स)
महेंद्र गणेश राजपूत (Mahendra Ganesh Rajput) या खेळाडूमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. मूळचा महाराष्ट्रीयन असलेल्या या रेडरनं गेल्या काही सीझन्समध्ये गुजरात जायंट्ससाठी (Gujarat Giants) 'गेमचेंजर'ची भूमिका निभावली आहे. सुरुवातीचे चार पीकेएल सीझन बंगाल वॉरियर्ससोबत खेळल्यानंतर राजपूत गुजरात जायंट्समध्ये आला. सीझन 5मध्ये त्यानं आपल्या कारकीर्दीतली सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यानं 62 पॉइंट्स मिळवून टीमला फायनलमध्ये जाण्यास मदत केली होती. राजपूतने यू-मुम्बा टीमविरुद्ध मॅजिकल 7 पॉइंट्सची रेड टाकली होती. सीझन 6मधला तो सर्वांत आयकॉनिक मोमेंट ठरला होता. सीझन 7मध्ये महेंद्र राजपूतला झालेली दुखापत गुजरात जायंट्सला महागात पडली होती, कारण ते प्लेऑफमध्येसुद्धा पोहोचू शकले नव्हते. सीझन 8साठी झालेल्या लिलावामध्ये त्याला पुन्हा गुजरात संघात घेण्यात आलं आहे. कोच मनप्रीत सिंग राजपूतला नक्कीच फ्रंटलाइन रेडर (frontline raider) म्हणून वापरतील अशा विश्वास आहे.
संदीप कांडोला (तेलुगू टायटन्स)
केपीएलच्या दुसऱ्या सीझनपासून संदीप कांडोलानं (Sandeep Kandola) तेलुगू टायट्न्सकडून लीगमध्ये प्रवेश केला होता. लेफ्ट कॉर्नर डिफेन्डर (Left Corner Defender) अशी ओळख असलेल्या संदीप कांडोलानं 59 टॅकल पॉइंट्स आणि सहा हाय-5सह 'सर्वोत्कृष्ट नवोदित' (Best Debutant) पुरस्कार मिळवला होता. या 'बेबी-फेस्ड अॅसेसिन'नं सीझन 2मध्ये पदार्पणात चमकदार कामगिरी केली होती. दीर्घ काळ विश्रांतीनंतर संदीपनं 67व्या आणि 68व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये देशांतर्गत सर्किटमध्ये 'सर्व्हिसेस'कडून जोरदार पुनरागमन केलं. मॅटवरचे त्याचे अँकल होल्ड आणि डाइव्हच्या बळावर सर्व्हिसेसनं दोन्ही वेळा सिल्व्हर मेडल्स जिंकली. संदीप कांडोलासाठी प्रो कबड्डीच्या लिलावामध्ये अनेक संघांनी बोली लावली होती परंतु तेलुगू टायटन्सनं त्याला संघात परत घेण्यासाठी 59.5 लाख रुपये खर्च केले. विशाल भारद्वाजची अनुपस्थिती भरून काढण्याची मोठी जबाबदारी कांडोलाकडे येण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pro kabaddi league