नवी दिल्ली, 28 मार्च : जगातली महान भारतीय क्रिकेटपटू मिताली राजचं (Mithali Raj) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या मन की बात (Mann ki Baat) मधून कौतुक केलं. मितालीची कहाणी फक्त महिलांनाच नाही तर पुरुष क्रिकेटपटूंनाही प्रेरणा देते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मितालीने काहीच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण केले आहेत. हा विक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या 75 व्या मन की बात मध्ये मितालीच्या या कामगिरीबद्दल भाष्य केलं. ‘भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजने काहीच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण केले. हा विक्रम करणारी ती पहिला महिला क्रिकेटपटू बनली. तिला खूप खूप शुभेच्छा. मिताली महिला वनडे आंतरराष्ट्रीयमध्ये 7 हजार रन करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. महिला क्रिकेटसाठी तिचं योगदान शानदार आहे,’ असं मोदी म्हणाले. ‘मितालीने आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकांना प्रभावित केलं. तिची मेहनत आणि यशाची कहाणी फक्त महिलाच नाही तर पुरुष क्रिकेटपटूंचं धैर्य वाढवणारं आहे,’ असं वक्तव्यही पंतप्रधानांनी केलं.
🙏 Thank you sir for your congratulatory wishes @narendramodi ji . https://t.co/metxGtyDcl
— Mithali Raj (@M_Raj03) March 28, 2021
38 वर्षांच्या मितालीनेही पंतप्रधानांच्या या कौतुकानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुमच्या शुभेच्छांच्या संदेशाबाबत खूप खूप धन्यवाद. पंतप्रधानांनी माझ्या कारकिर्दीतल्या रेकॉर्डचा उल्लेख करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे,’ असं ट्वीट मितालीने केलं. मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 मार्चला आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 10 हजार रन पूर्ण केले. पुढच्याच सामन्यात तिने वनडे क्रिकेटमध्येही 7 हजार रनचा टप्पा ओलांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये भारतीय नेमबाजांनी केलेल्या कामगिरीचंही कौतुक केलं आहे. भारताने या वर्ल्ड कपमध्ये 14 गोल्ड मेडलसह 28 पदकं जिंकली. याचसोबत या महिन्यात स्विस ओपनमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलेली भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही.सिंधूच्या (PV Sindhu) कामगिरीचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.