नवी दिल्ली, 6 जुलै : पाकिस्तान सुपर लीगच्या मुलतान सुलतान टीमचे मालक आलमगीर तरीन यांनी गुरुवारी त्यांच्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने पाकिस्तान क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पाकिस्तान न्यूज चॅनल जिओच्या माहितीनुसार तरीन यांनी स्वतःच्या डोक्यावर बंदूक ठेऊन गोळी मारत आत्महत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तरीनने आत्महत्येपूर्वी एक नोट लिहिली होती. त्यात त्याने लिहिले की ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. परंतु याशिवाय त्यांनी दुसरे काहीही लिहिले नाही. तरीनच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, त्याने कधीही आपल्या आजाराचा उल्लेख त्याच्या मित्रांसोबत किंवा जवळच्या व्यक्तींसोबत केला नव्हता. आलमगीर तरीन अविवाहित असून ते 63 वर्षाचे होते. डिसेंबरमध्ये ते विवाहबंधनात अडकणार होते.
मुलतान सुलतान क्रिकेट फ्रेंचायझीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, आलमगीर तरीन याला खेळात रस असल्याने त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये संघ विकत घेतला. तरीनने कठीण काळात पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान याला साथ दिली होती. मोहम्मद रिजवान हा पीएसएलमध्ये तरीनच्या मुलतान सुलतान या संघाचा कर्णधार होता. रिजवानच्या नेतृत्वाखाली संघाने स्पर्धेचे विजेतेपद देखील पटकावले होते.