लाहोर, 14 ऑक्टोबर : मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Match Fixing Pakistan) पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. फिक्सिंगची माहिती न दिल्यामुळे नॅशनल टी-20 कप (National T20 Cup) खेळणाऱ्या झिशान मलिक (Zeeshan Malik) याचं निलंबन करण्यात आलं आहे, यामुळे आता झिशान कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. झिशानने 2016 साली अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. 56 च्या सरासरीने त्याने 225 रन केले होते.
झिशान मलिकने नॅशनल टी-20 कपमध्ये नॉर्थन टीमकडून खेळताना 25 च्या सरासरीने 123 रन केले, पण त्याच्या टीमला फायनलमध्ये प्रवेश मिळाला नाही. 24 वर्षांच्या झिशान मलिकने फिक्सिंगबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला माहिती दिली नसल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पीसीबीने गुरुवारी झिशानला भ्रष्टाचारविरोधी नियमानुसार निलंबित केलं. 2016 साली झिशानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2019-20 साली त्याने 52 च्या सरासरीने 780 रन केले होते.
उमर अकमलवरही अशीच कारवाई
याआधी याच नियमानुसार पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू उमर अकमल (Umar Akmal) याच्यावरही अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती. एप्रिल 2020 साली त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली, पण अपीलनंतर त्याची शिक्षा 18 महिन्यांची करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात त्याचं पुनरागमन झालं, पण आता तो अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला असल्याचं वृत्त आलं, उमर अकमलने मात्र या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये फिक्सिंगचा इतिहास राहिला आहे. टीमचा माजी कर्णधार सलमान बट यालाही या प्रकरणी जेलमध्ये जावं लागलं. 28 ऑगस्ट 2010 साली लॉर्ड्सवर झालेल्या टेस्टमध्ये मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसिफ यांनी पैसे घेऊन नो बॉल टाकले, यात कर्णधार असलेल्या सलमान बटचाही समावेश होता. पण मोहम्मद आमिरचं 2016 साली पाकिस्तान टीममध्ये पुनरागमन झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.