मुंबई, 26 मे : भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेत गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक टंचाई आहे. या आर्थिक टंचाईमुळे देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. श्रीलंकेप्रमाणेच देशाच्या पश्चिमेला असलेल्या पाकिस्तानमध्येही आर्थिक परिस्थिती खालावली (Economic Crises in Pakistan) आहे. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात आहे. देशातील सरकार बदललं पण, हे संकट संपलेलं नाही. उलट, आता परिस्थिती आणखी चिघळली असल्याचा दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजनं (Mohammad Hafeez) केला आहे. मोहम्मद हाफिजनं पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांची परिस्थिती सांगणारं एक ट्विट केलं असून त्यामध्ये त्यानं देशातील प्रमुख राजकीय नेत्यांना टॅग केलं आहे. ‘लाहोरमधील कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नाही. एटीएम मशिनमध्ये पैसे नाहीत. सामान्य नागरिकांना राजकीय निर्णयांचा त्रास का सहन करावा लागतोय?’ असा ट्विट हाफिजनं केलं असून त्यामध्ये त्यानं माजी पंतप्रधान इम्रान खान, विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो आणि मरयम शरीफ यांना टॅग केलं आहे.
No Petrol available in any petrol station in Lahore??? No cash available in ATM machines?? Why a common man have to suffer from political decisions. @ImranKhanPTI @CMShehbaz @MaryamNSharif @BBhuttoZardari
— Mohammad Hafeez (@MHafeez22) May 24, 2022
पाकिस्तानमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात इम्रान खान यांना सत्तेतून हटवल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपद स्वीकारले आहे. मोहम्मद हाफिजनं पाकिस्तानचे तीन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधत्व केले आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन असलेल्या हाफिजनं जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. शिक्षा Yasin Malik ला, पण पोटदुखी Shahid Afridi ला, अमित मिश्राने केली बोलती बंद! पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या समर्थकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं असून सरकार त्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे पाकिस्तानातील गोंधळात भर पडली आहे. देशात नव्यानं निवडणुका घ्याव्या या मागणीसाठी इम्रान खान हे आंदोलन करत आहेत. त्यांना इस्लामाबादमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सरकारनं पोलिसांना बळाचा वापर करण्याची पूर्ण सूट दिली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये देशातील आर्थिक परिस्थिती झपाट्यानं बिघडत असून IMF नं मदतीचं पॅकेज द्यावं अशी पाकिस्तानची अपेक्षा आहे.