मुंबई, 1 एप्रिल : बीसीसीआय (BCCI) सहा महिन्यांमध्ये दोनदा आयपीएल (IPL 2021) खेळवण्यासाठी तयार झाली आहे. जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने अजूनपर्यंत 400 पेक्षा जास्त अंपायर्स, मॅच अधिकारी, स्कोअरर आणि व्हिडिओ एनलिस्ट यांचे पैसे दिलेले नाहीत. यातल्या अनेक मॅच अधिकाऱ्यांना मागच्या एका वर्षापासूनचे पैसे बीसीसीआयकडून मिळालेले नाहीत. याशिवाय स्थानिक क्रिकेटपटूंनाही त्यांचं मानधन मिळालेलं नाही.
कोरोना महामारीमुळे रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळवता आली नाही, पण क्रिकेटपटूंना मानधन मिळेल असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं होतं. भारताच्या स्थानिक क्रिकेटची सुरूवात यावर्षी जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपासून झाली होती. यानंतर विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) आणि महिलांची वनडे स्पर्धा झाली, पण अजूनही खेळाडू मानधनाच्या प्रतिक्षेत आहेत.
न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने अंपायर आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना बिलाची रक्कम द्यायला सांगितली होती. स्पर्धा संपल्यानंतर 15 दिवसांमध्येच पैसे दिले जातात, पण यावेळी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) होऊन 2 महिने झाले तरी पैसे मिळालेले नाहीत, असं एका अंपायरने सांगितलं.
बीसीसीआयकडे क्रिकेट संचालन जनरल मॅनेजर नसल्यामुळे खेळाडू आणि अधिकाऱ्यांना पैसे देण्यात आले नसल्याचं सांगण्यात येत आहे. मागच्यावर्षी साबा करीम (Saba Karim) यांनी बीसीसीआयच्या क्रिकेट ऑपरेशन्स पदावरून राजीनामा दिला होता, त्यानंतर हे पद अजूनही भरलं गेलेलं नाही. याशिवाय महाप्रबंधक केव्हीपी राव यांनाही मागच्या डिसेंबर महिन्यात पदावरून पायउतार व्हायला सांगण्यात आलं होतं. केव्हीपी राव अंपायर्स आणि मॅच अधिकाऱ्यांच्या गोष्टी बघायचे. पैसे मिळाले नसल्यामुळे सर्वाधिक नुकसान अशा मॅच अधिकारी आणि अंपायरचं होतंय, जे फक्त बीसीसीआयकडून मिळणाऱ्या कमाईवर अवलंबून आहेत. यातल्या अनेकांना मागच्या मार्च महिन्यापासून पैसे मिळालेले नाहीत.
मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात बीसीसीआयची बैठक झाली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांचा एक समूह बनवला जाईल, जो मॅच अधिकारी आणि क्रिकेटसंबंधीच्या अन्य गोष्टींवर लक्ष देईल, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला 3 महिन्यांपेक्षा जास्तचा काळ झाल्यानंतरही अशा समूहाबाबत कोणताही निर्णय अथवा चर्चा झालेली नाही. आयपीएलच्या मागच्या मोसमातून बीसीसीआयने 4 हजार कोटी रुपयांची कमाई केली होती. तरीही अजून खेळाडू, अंपायर आणि अधिकाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, IPL 2021, Vijay hazare trophy