नवी दिल्ली, 02 मार्च : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी न्यूझीलंड दौऱा आठवणीत ठेवावा असा झाला नाही. सुरुवात जरी ऐतिहासिक विजयाने झाली असली तरी शेवट मात्र कटू झाला. पाच सामन्यांची टी20 मालिका जिंकल्यानंतर भारताने एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत सपाटून मार खावा लागला. संपूर्ण मालिकेत विराटची बॅट तळपलीच नाही. कसोटी मालिकेत तर विराटची अवस्था खूपच बिकट होती. चार डावात त्याने 19,2,14, 3 अशा धावा केल्या. या कामगिरीमुळे विराटवर टीका केली जात आहे. मात्र पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने त्याचं समर्थन केलं आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर विराट 11 डावात मिळून 218 धावाच करू शकला. तीनही क्रिकेट प्रकारात कोणत्याही दौऱ्यातील ही कोहलीची सर्वात निराशाजनक कामगिरी आहे. कसोटीमध्ये तर विराटला फक्त 38 धावा करता आल्या. त्यामुळे त्याच्या आक्रमकपणावरून अनेकांनी सल्ला दिला आहे. त्याला पाकिस्तानचा क्रिकेटपटू इंजमाम उल हकने उत्तर दिलं आहे. इंजमाम उल हकने म्हटलं की,‘अनेकजण विराटच्या आक्रमक शैलीबद्दल बोलत आहे. त्यानं 70 शतकं केली आहेत. तुम्ही त्याच्या शैलीवर कसा प्रश्न उपस्थित करू शकता.’ ‘‘प्रत्येक खेळाडू बॅड पॅचमधून जातो. याचा अर्थ असा नाही की तो काहीच करत नाही. एक क्रिकेटपटू म्हणून मी सांगू शकतो की अशी वेळ येते जेव्हा धावा निघत नाहीत. मोहम्मद युसुफ बॅकलिफ्ट चांगला खेळायचा पण खराब फॉर्म असताना त्याच्यावर टीका करायचे. तेव्हा याच शॉटने तू किती धावा केल्यास हे त्याला सांगायचो’’, असं इंजमाम म्हणाला.
दोन्ही कसोटी मालिकेत भारताचा एकही फलंदाज शतक करू शकला नाही. चार डावात तीनवेळा भारताचा संघ 200 धावांच्या आता ऑलआउट झाला. न्यूझीलंडने दोन्ही सामने सहज जिंकले. इंजमाम म्हणाला की,‘कोहली जर खेळू शकला नाही तर टीम इंडियाची कामगिरी वाईट झाली. मग इतर खेळाडूंनी काय केलं? हा खेळाचा एक भाग आहे. यात जे होतंय ते स्वीकारलं पाहिजे. विराटने त्याच्या शैलीत बदल करू नये असा सल्लाही इंजमामने दिला. हे वाचा : लेकीला घेऊन मैदानावर आला भारतीय क्रिकेटपटू, तुम्ही ओळखलंत का?

)







