दुबई, 28 एप्रिल : झिम्बाब्वेचा हीथ स्ट्रीक (Heath Streak) आणि श्रीलंकेच्या दिलहरा लोकुहितगे (Dilhara Lokuhettige) यांच्यानंतर आयसीसीने आणखी एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर मॅच फिक्सिंगप्रकरणी कारवाई केली आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू नुवान झोयसा (Nuwan Zoysa) याच्यावर आयसीसीने (ICC) 6 वर्षांची बंदी घातली आहे. याआधी आयसीसीने हीथ स्ट्रीक आणि दिलहरा लोकुहितगेचं 8 वर्षांसाठी निलंबन केलं होतं. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी लवादाने ही कारवाई केली आहे.
भ्रष्टाचारविरोधी लवादाच्या चौकशीमध्ये झोयसा दोषी आढळल्यामुळे त्याचं निलंबन करण्यात आलं आहे. 31 ऑक्टोबर 2018 पासून झोयसावरच्या कारवाईला सुरुवात झाली आहे, कारण याच दिवसापासून त्याचं प्रथम दर्शनी पुरावे आढळल्यामुळे निलंबन करण्यात आलं होतं.
नुआन झोयसा आयसीसीचा भ्रष्टाचारविरोधी नियम 2.1.1, 2.1.4 आणि 2.4.4 मध्ये दोषी आढळला. नुआन झोयसा आयसीसीच्या अनेक भ्रष्टाचारविरोधी शिक्षणाच्या सत्रांमध्ये भाग घेतला होता, त्यामुळे त्याला आपण करत असलेल्या गोष्टी नियमाविरोधात आहेत, हे माहिती होतं, असं आयसीसीचे जनरल मॅनेजर एलेक्स मार्शल म्हणाले.
आयसीसीशिवाय झोयसावर एमिरट्स क्रिकेट बोर्डाकडूनही भ्रष्टाचारविरोधी नियम तोडल्याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. एमिरट्स क्रिकेट बोर्डाच्या टी-10 लीगमध्येही झोयसावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
1997 साली नुआन झोयसाने न्यूझीलंडविरुद्ध ड्युनडिन टेस्टमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याच सीरिजमध्ये झोयसा क्राईस्टचर्चमध्ये त्याची पहिली वनडे खेळला. 10 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये झोयसाने शेवटची वनडे 2007 साली भारताविरुद्ध खेळली.
फास्ट बॉलर राहिलेल्या नुआन झोयसाने 30 टेस्टमध्ये 64 विकेट आणि 95 वनडेमध्ये 108 विकेट घेतल्या. प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी-20 क्रिकेटमध्ये झोयसाने एकूण 564 विकेट मिळवल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Icc, Spot fixing