मुंबई, 10 जून : मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नेता नवीन जिंदल (Navin Jindal) यांची प्राथमिक सदस्यता पक्षाने रद्द केली आहे. तसंच या दोघांविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला आहे. यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारत सरकारचं कौतुक केलं आहे. शोएब अख्तरने ट्विटरवर त्याची भूमिका मांडली. काय म्हणाला शोएब अख्तर? ‘पैगंबर मोहम्मद यांचा सन्मान आमच्यासाठी सगळं काही आहे. आमचं जगणं मरणं आणि सगळं काही करणं फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे. आमच्या प्रिय पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत अपमानजनक शब्दांचा वापर करणाऱ्यांची मी तीव्र शब्दांमध्ये निंदा करतो. हे लाजिरवाणं वक्तव्य करणाऱ्या लोकांचं निलंबन केल्याबद्दल मी भारत सरकारचं स्वागत करतो. अशा लोकांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे, ज्यामुळे पुन्हा असं कोणी करणार नाही, याची काळजी भारत सरकारने घ्यावी,’ असं शोएब त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.
दरम्यान नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्या वक्तव्याचे पडसाद आज भारतातही उमटले. देशभरातल्या वेगवेगळ्या भागात मुस्लीम जमावाकडून आंदोलनं करण्यात आली.