मुंबई, 26 मार्च : नीतू घंघास आणि स्वीटी बुरानंतर भारताची स्टार बॉक्सर निखत झरीनने देशाला महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिल आहे. यंदाच्या स्पर्धेतील भारताला मिळालेले हे तिसरे सुवर्णपदक असून 50 किलो वजनी गटात निखतने ही कामगिरी केली आहे. भारताच्या निखत झरीनने 50 किलो वजनी गटात वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये व्हिएतनामच्या बॉक्सरचा पराभव केला आहे. तिने व्हिएतनामच्या न्यूगेन थी ताम हिचा 5-0 ने दारुण पराभव केला. फायनलमध्ये सामन्यात निखतने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी सुरु ठेऊन पहिल्या फेरीत प्रतिस्पर्ध्या विरुद्ध 5-0 अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या फेरीतही तिने आघाडी कायम ठेवली. अखेर तिसऱ्या सामन्यातही यशस्वीपणे प्रतिस्पर्धी खेळाडूला मात देऊन निखतने सामना जिंकला.
भारताचे यंदा या स्पर्धेतील हे तिसरे सुवर्णपदक असून शनिवारी 45- 48 किलो वजनी गटात नीतू घंघासने मंगोलियन बॉक्सरला हरवून सुवर्ण कामगिरी केली. तर त्यापाठोपाठ स्वीटी बुरा हिने देखील 75-81 किलो गटात सुवर्णपदक जिंकले.