रांची, 5 मे: चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी
(MS Dhoni) आयपीएल स्पर्धा
(IPL 2021) स्थगित झाल्यानं आता घरी परतणार आहे. या आयपीएलमध्ये चेन्नईची कामगिरी चांगली झाली. चेन्नईनं सातपैकी पाच सामने जिंकले. स्पर्धा स्थगित झाली तेंव्हा धोनीची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. सध्या नवी दिल्लीमध्ये असलेला धोनी त्याच्या रांचीमधील घरी परत जाईल त्यावेळी एक खास पाहुणा त्याच्या स्वागतासाठी सज्ज असेल. महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी
(Sakshi Dhoni) हिनं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ
(Instagram Video) शेअर करुन घरातील नव्या पाहुण्याची सर्वांना ओळख करुन दिली आहे.
महेंद्रसिंह धोनी मागच्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. आता तो फक्त आयपीएल स्पर्धा खेळतो. उर्वरित काळात धोनी रांची येथील त्याच्या घरात असतो. धोनीला बाईकची आवड आहे. त्याचबरोबर तो रांचीमधील त्याच्या फार्म हाऊसवर शेती देखील करतो.
धोनी सोशल मीडियावर सक्रीय नसला तरी त्याची पत्नी साक्षी चांगलीच सक्रीय आहे. ती नियमितपणे धोनीचे अपडेट्स सर्वांशी शेअर करत असते. तिनं नुकताच एक व्हिडीओ शेअर करुन धोनीच्या घरातील नव्या पाहुण्याची माहिती दिली आहे. धोनीला घोडेस्वारीचा नाद असून त्याच्या घरात आता चेतक या घोड्याचं आगमन झालं आहे. साक्षीनं त्याचा व्हिडीओ शेअर केलाय.
साक्षीनं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, "चेतक तुझे घरी स्वागत आहे. तू एक सभ्य प्राणी आहेस. तुझी लिली (धोनीचा पाळीव कुत्रा) भेट झाली. आता घरातील अन्य व्यक्तींची ओळख करुन द्यायची आहे. साक्षीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये चेतक या घोड्यासोबत लिली हा धोनीचा कुत्रा देखील आहे.
महेंद्रसिंह धोनीला विदेशी कुत्रे पाळण्याची हौस आहे. त्याच्या घरात विदेशी वंशाचे अनेक कुत्रे आहेत. धोनीकडील सॅम या बेल्जियम वंशाच्या कुत्र्याची किंमत भारतीय बाजारपेठेत 75 हजार रुपये आहे. लिली आणि गब्बर या कुत्र्यांची किंमत 60 ते 80 हजार आहे. त्याचबरोबर माहीकडं एक डच वंशाचा शेपर्ड कुत्रा असून त्याचं नाव झोया आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.