दिल्ली, 28 एप्रिल : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध दिग्गज कुस्तीपट्टूंनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राही आता कुस्तीपट्टूंच्या समर्थनार्थ उतरला आहे. नीरज चोप्राने ट्विटरवर म्हटलं की, बृजभूषण सिंहविरुद्ध आंदोलन करणाऱ्या कुस्तीपट्टूंना लवकरात लवकर न्याय मिळावा. एथलीट्सना न्यायाची मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेलं पाहून वाईट वाटतंय. आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, आपल्याला अभिमान वाटावा यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतलीय. नीरज चोप्रा म्हणाला की, एक देश म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीची एकता आणि सन्मान अबाधित ठेवण्याची जबाबदारी आहे. जे होत आहे ते कधीच व्हायला नको. हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि हा निष्पक्ष आणि पारदर्शकपणे सोडवला पाहिजे. न्याय देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करायला हवी. क्रीडा मंत्री 12 तास काय 12 मिनिटंही बोलले नाही; दिग्गज कुस्तीपटूंचा आरोप विनेश फोगाटने गुरुवारी तिच्या भावनांना वाट मोकळी करताना भारतीय क्रिकेटपटू आणि इतर दिग्गज खेळाडूंनी मौन बाळगल्याची खंत व्यक्त केली होती. ब्लॅक लाइव्ह मॅटर आंदोलनाचं उदाहरण देताना म्हटलं की, असं नाही की आपल्या देशात मोठे एथलीट नाहीत. अनेक क्रिकेटर आहेत ज्यांनी ब्लॅक लाइव्ह मॅटर आंदोलनावेळी आपलं समर्थन दिलं होतं. आम्ही इतकेही पात्र नाहीय का? असा उद्विग्न प्रश्न विनेश फोगाटने विचारला होता. विनेश फोगाटने रात्री माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, क्रीडा मंत्र्यांनी 12 तासच काय पण एकूण 12 मिनिटांचा वेळही दिला नाही. तर बजरंग पुनियानेसुद्धा असा आरोप केला की, क्रीडा मंत्र्यांनी त्यानंतर एकदाही भेटण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा आम्ही प्रयत्न केला तेव्हा त्यांचे अधिकारी एवढंच सांगतात की साहेब बिझी आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून साहेब बिझी आहेत काय असा प्रश्न पुनियाने विचारला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.