मुंबई, 29 ऑगस्ट : देशाच्या इतिहासात 29 ऑगस्टचं एक विशेष महत्त्व आहे. याच दिवशी 1905 साली जगातील महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांचा जन्म झाला. हॉकीच्या या जादूगाराचे स्मरण म्हणून आजचा दिवस देशभर राष्ट्रीय क्रीडा दिवस (National Sports Day) म्हणून देखील साजरा केला जातो. भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाचे जनक अशीही ध्यानचंद यांची ओळख आहे.
ध्यानचंद यांनी भारताला तीन ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1928, 1932 आणि 1936 साली भारताने हे गोल्ड मेडल जिंकले होते. त्यावेळी त्यांच्या कौशल्यानं सारं जग अचंबित झालं होतं. ध्यानचंद हे 1936 साली बर्लिनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये हॉकी टीमचे कॅप्टन होते.
ध्यानचंद यांचे भाऊ रुप सिंह हे दिग्गज हॉकीपटू होते. तसंच त्यांचे वडिल समेश्वर सिंह देखील चांगले हॉकीपटू होते. पण, ध्यानचंद यांना लहानपणी हॉकीमध्ये जास्त रुची नव्हती. त्यांना हॉकीपेक्षा कुस्ती हा खेळ जास्त आवडत असेल. पण, लष्करात दाखल झाल्यानंतर त्यांनी हॉकी खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर थोड्यात कालावधीमध्ये ते अव्वल हॉकीपटू बनले. ध्यानचंद यांनी 1926 साली न्यूझीलंडमध्ये 10 गोल केले होते. त्यावेळी भारतानं न्यूझीलंडमध्ये झालेले 21 पैकी 18 सामने जिंकले होते.
ध्यानचंद यांच्या कारकिर्दीशी संबंधित अनेक संस्मरणीय आठवणी आहे. पण यामध्ये जर्मनीचा हुकूमशाह हिटलरसोबतची त्यांची आठवण खास आहे. 1936 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी हिटलरने ध्यानचंदला जर्मनीचे नागरिकत्व तसेच लष्करात कर्नला हुद्दा असा प्रस्ताव ठेवला होता.
ड्वेन ब्राव्होसमोर आली होती अश्विन स्टाईल आऊट करण्याची संधी, पण...VIDEO
त्यावेळी ध्यानचंद यांनी हा प्रस्ताव तात्काळ फेटाळला. 'मी भारताचं मीठ खाल्लं आहे. त्यामुळे मी भारताकडूनच खेळेल,' असं उत्तर त्यांनी हिटलरला दिलं होतं. ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबक लावण्यात आले आहे, अशीही काहींची समजूत होती. त्यामुळे त्यांनी ध्यानचंद यांची हॉकी स्टिक देखील तपासली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.