सध्या मुंबईत मुंबई टी-20 लीगचे घमासान सुरु आहे. मात्र, यात आता महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा संघ असलेल्या आकाश टायगर्स संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. शनिवारी वानखेडेवर झालेल्या सेमीफायनल सामन्यात आकाश टायगर्स संघाला सोबो सुपरसोनिक्स संघानं 26 धावांनी मात दिली. आणि फायनलमध्ये प्रवेश केला.
या सामन्यात सोबो सुपरसोनिक्स संघाचा कर्णधार जय गोकुळ बिस्टा यानं अर्जुनची शाळा घेतली. जय बिस्टानं मुंबई टी-20 लीगमधले पहिले शतक ठोकले तेही केवळ 57 चेंडूत. त्यांने 60 चेंडूत 110 धावा केल्या.
जयनं प्रत्येक गोलंदाजाची शाळा घेतली. यात अर्जुनलाही त्यानं सोडले नाही. अर्जुन तेंडुलकरच्या 3 ओव्हरमध्ये 37 धावा केल्या. मात्र आकाश टायर्गसच्या इतर गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट 8 रन प्रति ओव्हरपेक्षाही जास्त होता.
जयनं आपल्या शतकी खेळीमध्ये 5 षटकार आणि 9 चौकार लगावले. तर, त्याला साथ दिली ती, हर्ष टैंक या खेळाडूनं. त्यानं 51 चेंडूत 93 धावांची तुफान खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 18 ओव्हरमध्ये 196 धावांची भागीदारी केली.
मुंबई टी-20 लीगच्या फायनलमध्ये आता सोबो सुपरसोनिक्स आणि नॉर्थ मुंबई पॅंथर्स यांच्यात सामना होणार आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होईल.