मुंबई, 26 जुलै : टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेला एमएस धोनी सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. धोनीची नेट वर्थ सध्या 127 मिलियन डॉलर म्हणजेच 1040 कोटी आहे. पण एमएस धोनीचं ऑफर लेटर व्हायरल होत आहे. धोनीचा पगार पाहून त्याचे चाहते हैराण आहेत. 2008 साली आयपीएलच्या पहिल्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार झालेला एमएस धोनी अजूनही या फ्रॅन्चायजीसोबत खेळत आहे. सीएसकेची टीम धोनीला दरवेळी कोट्यवधी रुपये देऊन रिटेन करते. 2012 साली इंडिया सिमेंट्सन धोनीला उपाध्यक्ष म्हणून नोकरीची ऑफर दिली होती. हे ऑफर लेटर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नोकरीसाठी धोनीला फक्त 43 हजार रुपयांचं वेतन देण्यात आलं होतं. या लेटरनुसार जुलै 2012 साली धोनीला चेन्नईमध्ये इंडिया सिमेंट्सच्या मुख्य कार्यालयात उपाध्यक्ष म्हणून नोकरीची ऑफर देण्यात आली होती. या ऑफर लेटरमध्ये धोनीचा महिन्याचा पगार 43 हजार रुपये होता, यामध्ये 21,970 रुपये महागाई भत्ता आणि 20 हजार रुपये विशेष वेतन होतं. चेन्नईमध्ये राहिल्यानंतर धोनीला 20,400 रुपयाचं हाऊस रेंट अलाऊन्स मिळेल, पण तो चेन्नईमध्ये असेल तर प्रत्येक महिन्याला 8,400 आणि बाहेर असेल तर 8 हजार रुपयांचा स्पेशल एचआरए देण्यात येईल. तसंच त्याला प्रत्येक महिन्याला 60 हजार रुपयांचा विशेष भत्ता आणि वृत्तपत्रासाठी 175 रुपयेही मिळतील, असं ऑफर लेटरमध्ये नमूद करण्यात आलं होतं.
इंडिया सिमेंट्स ही कंपनी एन.श्रीनिवासन यांची आहे, जे एमएस धोनीची आयपीएल टीम सीएसकेचे मालक आहेत. ज्यावर्षी धोनीला 43 हजार पगाराची नोकरी ऑफर करण्यात आली होती, तेव्हा सीएसकेने त्याला 8.82 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं हे ऑफर लेटर 2017 साली माजी आयपीएल प्रमुख ललित मोदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं होतं. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आयसीसी आणि बीसीसीआयकडून आता ललित मोदी यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.