मुंबई, 7 जुलै : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी आजही कॅप्टन कूलची फॅन फॉलोईंग कमी न होता वाढतच चालली आहे. धोनीच्या वाढदिवसानिमित्ताने आंद्रप्रदेशमधील त्याच्या चाहत्यांनी धोनीच भव्य पोस्टर उभारलं आहे. एम एस धोनीच्या आंध्रप्रदेशमधील चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त त्याचे 77 फुटांचे भव्य दिव्य पोस्टर उभारले आहे. हे पोस्टर आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटरसाठी उभारण्यात आलेल्यापैकी सर्वात मोठे पोस्टर आहे. 7 जुलै रोजी धोनीच्या चाहत्यांनी या पोस्टरवर दुग्धाभिषेक केला आणि आपल्या लाडक्या क्रिकेटपटूच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. आंद्रप्रदेशसह हैदराबाद येथील धोनीच्या चाहत्यांनी देखील 52 फुटांचे पोस्टर उभारले.
सध्या या भव्य पोस्टर्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून एम एस धोनीला त्याचे चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. धोनीनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 332 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं. या पैकी भारतानं 178 सामने जिंकले तर 120 सामन्यांमध्ये पराभव झाला. तसेच यातील 13 सामने अनिर्णित राहिले, तर 6 टाय आणि 15 ड्रा झाले.