सिराजचा खुलासा, सिडनी टेस्टमध्ये वर्णभेदी शेरेबाजीवर अंपायरने त्याला 'हे' सांगितलं

सिराजचा खुलासा, सिडनी टेस्टमध्ये वर्णभेदी शेरेबाजीवर अंपायरने त्याला 'हे' सांगितलं

भारताच्या क्रिकेट टीममधील गोलंदाज मोहम्मद सिराजनं हैद्राबाद इथं एक खळबळजनक खुलासा केला आहे.

  • Share this:

हैद्राबाद, 21 जानेवारी : भारताचा (India) जलद गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) पहिल्यांदाच सिडनी टेस्टमध्ये (Sydney test) त्याच्याविरोधात वर्णभेदी टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, की सिडनी टेस्टमध्ये काही प्रेक्षकांनी त्याच्यावर वर्णभेद करणाऱ्या कमेंट केल्या होत्या. त्यानंतर मैदानावरच्या पंचांनी (Umpires) आपल्यापुढे तिसरी टेस्ट मध्येच सोडून देण्याचा पर्याय (option) दिला होता.

सिराज आणि टीम इंडियाचा (Team India) आणखी एक जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना सिडनी टेस्टमध्ये सलग दोन दिवस वर्णभेद करणाऱ्या शेरेबाजीला (racist abuse) सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर टीम इंडियाच्या (Team India) व्यवस्थापनानं प्रकरणाचं गांभीर्य ओळखून त्याची मॅच रेफरी डेविड बून यांच्याकडे तक्रारही केली होती.

याप्रकरणी नंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही माफी मागितली होती. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी टेस्टमध्ये (India vs Australia) काही प्रेक्षकांनी सिराजबद्दल अपशब्द वापरले होते. ही बाब सिराजने कर्णधार (Captain) अजिंक्य रहाणेच्या कानावर टाकली. पंच पॉल रीफेल आणि पॉल विल्सन यांनाही याची माहिती देण्यात आली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून टीम इंडियाचं आज मायदेशी आगमन झालं. त्यानंतर सिराजनं हैद्राबाद इथं पत्रकार परिषदेत(press conference)  बोलताना हा खळबळजनक खुलासा केला. तो म्हणाला, ‘मी ऑस्ट्रेलियात अपशब्दांचा मारा सहन केला. हे प्रकरण अजून सुरू आहे. बघूया यात मला न्याय मिळतो की नाही. माझं काम केवळ याची कर्णधाराला माहिती देणं एवढंच होतं.’

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी सर्वाधिक 13 विकेट घेणाऱ्या सिराजनं पुढं सांगितलं, ‘पंचांनी (Umpires) मॅच अर्ध्यात सोडून देण्यास सांगितलं. पण रहाणेने मॅच सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. आम्ही चूकच केली नाही, तर आम्ही खेळणार, असंही बजावून सांगितलं.’

प्रेक्षकांचा हा हुल्लडबाजपणाचा आपल्या चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणादायी ठरल्याचंही सिराजने सांगितलं. तो म्हणाला, ‘या प्रकरणाने मी मानसिकदृष्ट्या आणखी कणखर झालो. माझ्या खेळावर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही.’

वर्णभेद करणाऱ्या या कमेंटबाजीनंतर त्यादिवशी 6 प्रेक्षकांना मैदानावरून बाहेर काढण्यात आलं. तसंच क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही दोषींविरोधात कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

Published by: News18 Desk
First published: January 21, 2021, 11:40 PM IST

ताज्या बातम्या