23 वर्ष क्रिकेट जगतावर राज्य केल्यानंतर भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मितालीने सोशल मीडियावर तिच्या निवृत्तीची घोषणा केली. लहानपणी मितालीला क्लासिकल डान्सर व्हायचं होतं, तिच्या आईचीही हिच इच्छा होती, यासाठी मितालीने ट्रेनिंगलाही सुरूवात केली. पण एयरफोर्स ऑफिसर असलेल्या वडिलांना मुलीला क्रिकेटर बनवायचं होतं. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मितालीने डान्स सोडून हातात क्रिकेटची बॅट घेतली आणि जवळपास 23 वर्ष या खेळावर राज्य केलं. (Mithali Raj Instagram)
मिताली राज भारताची एकमेव (महिला आणि पुरुष) क्रिकेटर आहे, जिने कर्णधार म्हणून दोन वर्ल्ड कप फायनल खेळल्या. पण तिचं वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलं नाही. मितालीच्या नेतृत्वात टीम इंडिया 2005 साली वर्ल्ड कप फायनल खेळली होती. दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियनमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 98 रननी पराभव केला. यानंतर जुलै 2007 साली मितालीच्या नेतृत्वात पुन्हा एकदा टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली. तेव्हा इंग्लंडने मितालीच्या स्वप्नाला धक्का दिला. (AFP)
मितालीने वयाच्या 17व्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात तिने नाबाद 114 रन ठोकले. 2002 साली इंग्लंडविरुद्ध 19 वर्ष आणि 254 दिवसांची असताना मितालीने टॉन्टन टेस्टमध्ये द्विशतक ठोकत इतिहास घडवला. करेन रोल्टनचं 209 रनच्या सर्वाधिक टेस्ट स्कोअरचा विक्रमही मोडला. पाकिस्तानच्या किरण बलूचने वेस्ट इंडिजविरुद्ध 242 रन करून हा विक्रम नंतर मोडला, पण सगळ्यात लहान वयात द्विशतक ठोकण्याचा विक्रम आजही मितालीच्या नावावर आहे. (AFP)
मितालीचं वनडे करियर 22 वर्ष 274 दिवसांचं होतं. महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तिच्याआधी पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ चाललेलं क्रिकेट करियर सचिन तेंडुलकरच्या नावावर होतं. सचिनने 22 वर्ष 91 दिवसांमध्ये 463 वनडे खेळल्या होत्या. (Mithali raj instagram)
मितालीच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचाही रेकॉर्ड आहे. तिने 232 वनडेमध्ये 50.68 च्या सरासरीने 7,805 रन केले. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स आहे. चार्लोटने 191 सामन्यांमध्ये 5,992 रन केले. मिताली चार्लोटपेक्षा 1813 रननी आघाडीवर आहे. वनडेमध्ये मितालीने भारताकडून सर्वाधिक 7 शतकं केली. तसंच सर्वाधिक 64 वेळा तिने 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन केले. महिला टी-20मध्ये मितालीने भारताकडून सगळ्यात जास्त 2,364 रनही केले आहेत. (AFP)
मितालीने महिला क्रिकेट कर्णधार म्हणून सर्वाधिक वनडे मॅच खेळल्या आहेत. 155 सामन्यांमध्ये तिने भारताचं नेतृत्व केलं, यातल्या 89 मॅच भारताने जिंकल्या तर 63 गमावल्या. मितालीच्या कॅप्टन्सीमध्ये भारताने 58 टक्के मॅच जिंकल्या. मितालीशिवाय इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स आणि ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने 100 पेक्षा जास्त मॅचमध्ये टीमचं नेतृत्व केलं. (AFP)
मिताली 6 वर्ल्ड कप खेळणारी एकमेव महिला क्रिकेटर आहे. तिने 1999 साली वनडेमध्ये पदार्पण केल्यानंतर सगळे वर्ल्ड कप खेळले, यातल्या दोन वर्ल्ड कप फायनलमध्ये तिने भारताची कॅप्टन्सी केली. (Mithali raj instagram)