नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : वेस्ट इंडिजचा (West Indies) क्रिकेटपटू मार्लोन सॅम्युअल्स आणि इंग्लंडचा (England) अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. याआधी मार्लोननं बेन स्टोक्सच्या पत्नीवर आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. आता त्यानं 12 वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इंग्लंड क्रिकेट टीम संघातील खेळाडूंच्या पत्नी अब्जाधीश अॅलेन स्टॅनफोर्ड (Allan Stanford) यांच्यासोबत दिसत आहेत.
हा व्हिडीओ शेअर कररताना मार्लोननं खेळाडूंच्या पत्नीवर टीका केली आहे. याआधी सॅम्युअल्सनं अतिशय खालच्या पातळीवर सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये सॅम्युअल्सनं स्टोक्सला उद्देशून म्हटले होते की, “कोणताही गोरा मला खेळातून बाहेर करु शकत नाही. तुझी बायको माझ्याकडे पाठव. तिला 14 सेकंदात जमैकन करुन दाखवतो. तुला मी काय आहे ते माहित नाही". यावरून अनेक दिग्गजांनी सॅम्युअल्सवर टीका केली होती.
मार्लन सॅम्युअल्सनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये इंग्लंड खेळाडूंना लक्ष्य करुन अनेक पोस्ट केली आहे. त्याने 2008 च्या स्टॅनफोर्ड सुपर सिरीजचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये टूर्नामेंट आयोजक आणि अब्जाधीश अॅलेन स्टेनफोर्ड त्यावेळचा इंग्लंड संघाचा कर्णधार अल्स्टर कुक आणि मॅट प्रायर यांच्या पत्नीसमवेत आहेत. सॅम्युअल्सनं या व्हिडीओवर, 'मिस्टर. स्टॅनफोर्ड मी तुम्हाला कधीही विसरू शकत नाही. जेव्हा इंग्लंडच्या संघातील खेळाडूंच्या बायका तुमच्या मांडीवर बसल्या होत्या मी ते विसरू शकत नाही. ती अब्जाधीश असल्यामुळे ते योग्य आहे का?", असे अनेक प्रश्न विचारले आहेत.
काय आहे सॅम्युअल्स-स्टोक्स वाद?
बेन स्टोक्सने एका टेस्ट मॕच स्पेशल पॉडकास्टमध्ये सॅम्युअल्सवर विनोद केला होता. स्टोक्सनं गमतीने म्हटले होते की 14 दिवस क्वारंटाईन होण्याची वेळ माझ्या दुश्मनावरसुध्दा येऊ नये. यावर त्याच्या भावाने विचारले की यात तू मार्लोन सॅम्युअल्सबद्दलही बोलतोय का ? तर बेन स्टोक्स ‘नाही’ असे उत्तरला होता. या खेळाडूंमध्ये 2015 पासून वाद आहे. 2015मध्ये जेव्हा सॅम्युअल्सने ग्रेनेडा कसोटीत स्टोक्सला बाद केले होते आणि त्यानंतर सॕल्यूटची नक्कल करत त्याला चिडवले होते. यानंतर 2016 च्या टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यातही दोघ आमनेसामने आले होते.