मुंबई, 14 मार्च : पुण्यात पारपडलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पाश्वभूमीवर आता महाराष्ट्रात 'महिला महाराष्ट्र केसरी' स्पर्धा रंगणार आहे. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या वाहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद पटकावण्याची राज्यातील महिला कुस्तीपटू जय्यत तयारी करीत आहेत. अशातच या स्पर्धेचे ठिकाण आणि तारीख आता जाहीर करण्यात आली आहे.
महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा फक्त मॅट वरच खेळली जाणार असून या लढतीमधील अंतिम विजेत्याला हा ‘महिला महाराष्ट्र केसरी’ चा 'किताब आणि मानाची गदा दिली जाणार आहे. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली जिल्ह्यात रंगणार असून 23 आणि 24 मार्च रोजी याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे यांनी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटातील मल्ल सहभागी होणार असून महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील महिला मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत 45 जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.