नवी दिल्ली, 31 जुलै : भारताचा युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. 19 वर्षीय वेटलिफ्टरने पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. लालरिनुंगाचा 300 किलो (140+160 किलो) वजन उचलण्याचा प्रयत्न राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण मिळवण्यात यशस्वी ठरला. जेरेमीने चार वर्षांत तिसऱ्यांदा तिरंग्याची शान उंचावली आहे. 2018 च्या युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाशिवाय त्याने गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. आता त्याच्याकडून पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा आहे.
राष्ट्रकुल 2022 मध्ये भारताच्या खात्यात 5 वं पदक
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. जेरेमी लालरिनुंगापूर्वी, 30 जुलै (शनिवार) रोजी संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. त्यानंतर गुरुराजा पुजारीने 61 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.
त्याचवेळी ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. बिंदियारानी देवीने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला चौथे पदक मिळवून दिले. तिने 55 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे 130 वे पदक आहे. भारतापेक्षा फक्त ऑस्ट्रेलियाने जास्त पदके जिंकली आहेत.
CWG 2022: मीराबाई चानूची 'सुवर्ण' कामगिरी; गोल्ड मेडल जिंकत नवा विक्रम केला नावावर
सांगलीच्या खेळाडूनला रौप्यपदक
यापूर्वी सांगलीच्या संकेत महादेव सरगरने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे खाते उघडले आहे. त्याने वेटलिफ्टिंगच्या 55 किलो वजनी गटात 248 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. सुवर्णपदकापासून तो एक किलो दूर राहिला. मलेशियाच्या मोहम्मद अनिदने 249 किलो वजनासह सुवर्णपदक जिंकले. संकेतने स्नॅचच्या पहिल्याच प्रयत्नात 107 किलो वजन उचलले. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 111 किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात 113 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात संकेतने 135 किलो वजन उचलले आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी होऊ शकला नाही. यादरम्यान त्याला दुखापतही झाली. तो पदक घेण्यासाठी आला तेव्हा त्याच्या हातात पट्टी बांधलेली होती. पण या 21 वर्षीय युवा खेळाडूने पदक जिंकून इतिहास रचला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight lifting