मुंबई, 3 डिसेंबर : जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट (Usain Bolt) खेळाच्या जगातलं मोठं नाव आहे. फील्ड ऍण्ड ट्रॅक स्पर्धांमध्ये बोल्टने अनेक विक्रम केले आहेत. 35 वर्षांचा हा धावपटू अशा खेळाडूंपैकी एक आहे जो कायमच स्वत:ला चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो. आठ वेळा ऑलिम्पिक गोल्ड मिळवलेल्या उसेन बोल्टचं पहिलं प्रेम एथलिटिक्स नव्हतं, तर क्रिकेट होतं, त्यामुळे आता जमैकाच्या या स्टार खेळाडूचं लक्ष क्रिकेट करियरकडे आहे. उसेन बोल्टला जगातली सगळ्यात श्रीमंत आणि मोठी लीग असलेल्या आयपीएलमध्ये (IPL) खेळण्याची इच्छा आहे.
आयपीएलची लोकप्रियता भारतातच नाही तर जगभरात आहे. क्रिस गेल आणि आंद्रे रसेल हे जमैकाचे सुपरस्टार आयपीएलमध्ये मोठी नावं आहेत. उसेन बोल्ट यालाही आयपीएलबद्दल माहिती आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोल्टने आपल्याला आयपीएल खेळण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.
2022 सालच्या आयपीएलमध्ये तुला खेळायचं आहे का? असा प्रश्न बोल्टला विचारण्यात आला. तेव्हा त्याने 'निश्चितच. मी स्वत:चं प्रशिक्षण पूर्ण करेन. फिट होईन आणि मग तयार होईन,' असं उत्तर बोल्टने दिलं.
'त्यावेळी जमैकाचे दोन प्रमुख खेळ फूटबॉल आणि क्रिकेट होते, मी क्रिकेट बघायचो कारण माझ्या वडिलांना क्रिकेट आवडायचं. वडील प्रत्येक दिवशी क्रिकेट बघायचे. मीदेखील क्रिकेट बघत बघतच लहानाचा मोठा झालो,' असं बोल्ट म्हणाला.
2017 साली ट्रॅक ऍण्ड फील्डमधून निवृत्ती घेतलेला बोल्ट म्हणाला, 'क्रिकेटबद्दलचं माझं प्रेम खास आहे. लहान असताना पाकिस्तानची टीम माझी आवडती होती. वकार युनूस पाकिस्तानच्या महान फास्ट बॉलरपैकी एक होता, त्यामुळे मला त्याला बघायला आवडायचं. मी मोठा होईपर्यंत पाकिस्तान क्रिकेटचा प्रशंसक होतो, पण मग मला आपल्या घरच्या टीमला पाठिंबा द्यायला पाहिजे असं जाणवलं.'
उसेन बोल्ट आयपीएलमध्ये खेळतो का नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बोल्ट जेव्हा ऑस्ट्रेलियात गेला तेव्हा त्याने सॉकर क्लब सेन्ट्रल कोस्ट मेरिनर्ससाठी काही काळ फूटबॉलही खेळला. आयपीएलचा 2022 चा मोसम 8 ऐवजी 10 टीमचा होणार आहे. 30 नोव्हेंबरलाच आयपीएलच्या जुन्या 8 टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यानंतर आता लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम प्रत्येकी 3-3 खेळाडू विकत घेतील, यानंतर जानेवारी महिन्यात खेळाडूंचा मेगा ऑक्शन होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.