बंगळुरू, 21 ऑगस्ट : भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan) राष्ट्रीय क्रिकेट अॅकेडमी म्हणजेच एनसीएमधून (NCA) कोचिंग कोर्स पूर्ण केला आहे. आता इरफान पठाणची आयपीएल (IPL) टीमचा प्रशिक्षक व्हायची इच्छा आहे. ऑलराऊंडर राहिलेल्या इरफान पठाणने आपल्या करियरची सुरुवात स्विंग बॉलर म्हणून केली, यानंतर त्याने बॅटिंगमध्येही आपली प्रतिभा दाखवली. आता त्याला कोचिंगही करायची आहे. बंगळुरूच्या एनसीएमध्ये त्याने लेव्हल-2 कोचिंग कोर्स पूर्ण केला आहे. क्रिकट्रॅकरशी बोलताना इरफान पठाण म्हणाला, ‘जेव्हा तुमच्याकडे जवळपास 175 आंतरराष्ट्रीय मॅचचा अनुभव असतो आणि तुम्ही हा कोर्स करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक पैलू विस्ताराने समजतो. एनसीए याबाबत शानदार काम करत आहे. मी मागच्या 3 वर्षांपासून कोचिंग करत आहे, पण स्वत:च्या कोचिंगला मला पुढे घेऊन जायचं आहे.’ ‘भविष्यात आयपीएल टीमचा प्रशिक्षक व्हायची इच्छा आहे. राहुल द्रविड एनसीएसोबत असणं भारतीय क्रिकेटसाठी सर्वोत्तम आहे. द्रविडने आपली भूमिका इमानदारीत पार पाडत आहे. त्याने अंडर-19 आणि इंडिया-ए च्या खेळाडूंना तयार केलं. तो स्वत:कडे असलेलं ज्ञान इतरांना देतो,’ असं वक्तव्य पठाणने केलं. ‘हा एक शानदार कोर्स आहे. आपल्या कोचिंगला आणखी चांगलं करण्यासाठी या कोर्सची मदत होते. ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला कायमच प्रयत्न केले पाहिजेत. या कोर्सच्या 8 दिवसांमध्येही 2-3 पैलू तुम्हाला शिकायला मिळाले, तर तेदेखील खास आहे. मला कायमच हा कोर्स करण्याची इच्छा होती,’ अशी प्रतिक्रिया पठाणने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.