कोच्ची, 23 डिसेंबर : आयपीएल 2023 साठी झालेल्या लिलावात भारताच्या युवा खेळाडूंवरही मोठी बोली लागली. जम्मू-काश्मीरचा ऑलराऊंडर विव्रांत शर्माला त्याच्या बेस प्राईजपेक्षा अनेक पट जास्त रक्कम मिळाली. विव्रांत प्रमाणे भारताच्या आणखी एका खेळाडूचं नशीब चमकलं, त्याला हैदराबादने अनेक पट जास्त रक्कम देऊन विकत घेतलं. हिमाचल प्रदेशचा ऑलराऊंडर मयंक डागर याच्यावर हैदराबादने बोली लावली. मयंक डागर बॅटिंगसोबत डावखुरी स्पिन बॉलिंगही करतो. मयंक याआधी पंजाब किंग्सचाही भाग होता. मयंक भारताचा माजी ओपनर आणि पंजाब किंग्सचा मेंटर वीरेंद्र सेहवाग याचा भाचा आहे. मयंक डागरने या वर्षी हिमाचल प्रदेशकडून खेळताना चांगली कामगिरी केली. हिमाचलची टीम भारताची स्थानिक टी-20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचली होती. या सामन्यात मुंबईने हिमाचलचा पराभव केला, पण मयंकची कामगिरी चांगली झाली. त्याने 12 बॉलमध्ये नाबाद 21 रन केले तसंच 2 विकेटही घेतल्या. संपूर्ण स्पर्धेत मयंकने 7 मॅचमध्ये 12 विकेट घेतल्या. मयंकने 7 मॅचमध्ये 92 रनही केले. मयंकवर सुरुवातीला सनरायजर्स हैदराबादने लावली यानंतर राजस्थान रॉयल्सही या स्पर्धेत आली. अवघ्या काही सेकंदांमध्ये मयंक 20 लाखांच्या बेस प्राईजवरून 75 लाखांवर गेला. यानंतर हैदराबादच्या काव्या मारन यांनी मयंकसाठी 1 कोटी रुपयांची बोली लावली. हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातल्या बिडिंग वॉरमध्ये अखेर हैदराबाद जिंकली आणि मयंकला 1.8 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. जगदीश सुचितला रिलीज केल्यानंतर हैदराबादला डावखुऱ्या स्पिनरची गरज होती, त्यामुळे मयंकला त्याच्या बेसप्राईजपेक्षा जास्त रक्कम मिळाली. मयंकने 2016 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. आतापर्यंत 29 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 87 विकेट घेतल्या. तसंच 20.32 च्या सरासरीने 732 रनही केल्या. मयंक डागरने 44 टी-20 सामने खेळले यात त्याने 21.70 च्या सरासरीने 44 विकेट घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.