कोलकाता, 19 डिसेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सध्या लिलाव होत आहे. या लिलावात परदेशी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंनीही बाजी मारली. यात भारताचा अंडर-19 कर्णधार प्रियम गर्गला हैदराबाद संघानं 1.90 कोटींना विकत घेतले. मात्र सर्वात जास्त बोली लागली ती मुंबईकर यशस्वी जयस्वालवर. विजय हजारे ट्रॉफीमध्ये कमी वयात द्विशतकी खेळी करणारा यशस्वी चर्चेत आला. त्यानंतर यशस्वीला जानेवारीमध्ये होणाऱ्या अंडर-19 वर्ल्ड कप संघातही स्थान मिळाले. एकेकाळी मुंबईत पाणीपुरी विकणाऱ्या या खेळाडूला राजस्थान रॉयल्स संघानं 2.40 कोटींना विकत घेतले. यशस्वीनं सर्वांचे लक्ष वेधले ते विजय हजारे ट्रॉफीमध्ये. या स्पर्धेत 17 वर्षीय यशस्वी जयस्वाल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यशस्वीनं आपल्या वेगळ्या फलंदाजी शैलीनं सगळ्यांचे मन जिंकले आहे. हा तोच यशस्वी आहे, जो कधी मुंबईमध्ये पाणीपुरीची गाडी लावायचा. मात्र एकेदिवशी आझाद मैदानात क्रिकेट खेळत असताना त्यानं हातात घेतलेली बॅट पुन्हा खाली ठेवली नाही. विशेष म्हणजे यशस्वीच्या यशामागे अर्जुन तेंडुलकरचा मोठा हात आहे. आयपीएलच्या लिलावात 20 लाख बेस प्राईज असलेल्या यशस्वी एका दिवसात करोडपती झाला, मात्र मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मुंबईकडे सर्वात कमी रक्कम असल्यामुळं यशस्वीवर त्यांनी बोली लावली नाही.
अर्जुननं केले जयस्वाललं यशस्वी अर्जुन आणि यशस्वी खुप चांगले मित्र आहेत. या दोघांची मैत्री बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झाली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ट्रेनिंग घेत असताना अर्जुन आणि यशस्वी एकाच खोलीत राहायते. यावेळी यशस्वीनं तो सचिनचा खुप मोठा फॅन असल्याचे सांगितले. त्यानंतर अर्जुननं यशस्वी आणि सचिन यांची भेट घडवून आणली. सचिनच्या भेटीमुळं बदललं यशस्वीचं नशीब 2018मध्ये यशस्वी आणि अर्जुन यांची भेट झाली. दरम्यान, यावेळी मास्टर ब्लास्टरही यशस्वीच्या खेळीचा फॅन झाला. त्यामुळं खुश होऊन सचिननं यशस्वीला एक बॅट भेट दिली. एवढेच नाही तर याच बॅटनं यशस्वीनं क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यशस्वीनं याआधी अंडर-19 श्रीलंका दौऱ्यात आपल्या फलंदाजीची झलक दाखवली होती.