मुंबई, 31 मार्च : आयपीएल 2023 च्या यंदाच्या मोसमाला आजपासून सुरूवात होत आहे, पण या मोसमाआधीच सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे मुंबईचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह संपूर्ण मोसम खेळू शकणार नाही. जसप्रीत बुमराहऐवजी मुंबईने फास्ट बॉलर संदीप वॉरियरला रिप्लेसमेंट म्हणून घोषित केलं आहे. कोण आहे संदीप वॉरियर? संदीप वॉरियर बऱ्याच वर्षांपासून स्थानिक क्रिकेट खेळत आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये वॉरियर 200 पेक्षा जास्त मॅच खेळला आहे, ज्यात 69 टी-20 मॅचचाही समावेश आहे. संदीपने स्थानिक क्रिकेटमध्ये 362 विकेट घेतल्या आहेत. 2021 साली संदीपने टीम इंडियाकडून पदार्पण केलं होतं. पण या एकमेव सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. 31 वर्षांचा संदीप वॉरियर आयपीएलमध्ये आरसीबी आणि केकेआरच्या टीममध्ये होता. आयपीएलमध्ये संदीपला 5 मॅच खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने 2 विकेट घेतल्या. संदीपने 2012 साली केरळकडून स्थानिक क्रिकेट खेळायला सुरूवात केली, यानंतर तो तामिळनाडूमध्ये खेळण्यासाठी गेला. 68 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 62 विकेट घेतल्या. 19 रन देऊन 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसंच 7 च्या इकोनॉमी रेटने त्याने रन दिले आहेत. तर 69 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याला 83 आणि 66 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 217 विकेट मिळाल्या आहेत. इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडून संदीप वॉरियरने क्रिकेटला प्राधान्य दिलं. मुंबईकडून खेळण्यासाटी संदीप वॉरियरला 50 लाख रुपये मिळणार आहेत. संदीप वॉरियर मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यापासून उपलब्ध आहे. मुंबईचा पहिला सामना आरसीबीविरुद्ध रविवारी संध्याकाळी होणार आहे. मुंबई इंडियन्सची टीम रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, पियुष चावला, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, संदीप वॉरियर, अर्जुन तेंडुलकर, अरशद खान, कुमार कार्तिकेय, नेहल वढेरा, राघव गोयल, आकाश मधवाल, ऋतीक शौकीन, जेसन बेहरनडॉर्फ, ड्युआन जॉनसन, विष्णू विनोद, शम्स मुलानी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.