मुंबई, 19 मे : आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने गुरूवारी 18 मे रोजी हैदराबादविरुद्ध धमाकेदार शतक केलं. विराट कोहलीचं हे आयपीएल इतिहासातलं हे सहावं शतक होतं, याचसोबत विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या क्रिस गेलची बरोबरी केली आहे. विराटची ही खेळी पाहून क्रिकेट चाहते त्याचं कौतुक करत आहेत, तर फूड डिलिवरी कंपनी असलेल्या स्विगीने लखनऊ सुपर जाएंट्सचा फास्ट बॉलर नवीन उल हकवर निशाणा साधला आहे. विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात आयपीएल सामन्यादरम्यान मोठा वाद झाला होता. या वादाची सुरूवात मोहम्मद सिराज आणि नवीन उल हक यांच्यापासून झाली, पण नंतर विराट आणि नवीन यांच्यातही बाचाबाची झाली. मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना हात मिळवत होते, तेव्हाही दोघांमध्ये वाद झाले. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने वाद मिटवण्यासाठी नवीनला विराटसमोर बोलावलं, पण नवीन उल हकने विराटसोबत बोलायलाही नकार दिला. या वादामध्ये नंतर लखनऊचा मेंटर गौतम गंभीरनेही एण्ट्री घेतली, यानंतर विराट आणि गंभीरमध्येही वाद झाले. या भांडणानंतर विराट आणि नवीन उल हक यांच्यात सोशल मीडियावरूनही एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. मुंबईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने लवकर विकेट गमावल्यानंतर नवीनने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये तो मुंबई-आरसीबीची मॅच टीव्हीवर बघताना आंबे खाताना दिसत होता. आंबे गोड आहेत, असं कॅप्शन त्याने या स्टोरीला दिलं, पण यावर विराटने कोणतंच उत्तर दिलं नाही.
विराटच्या शतकानंतर स्विगीने नवीन उल हकला सोशल मीडियावरूनच डिवचलं आहे. ‘सॉरी आंबा… चिकूच खरा राजा आहे,’ याचसोबत स्विगीने मुकूटाची स्माईलीही पोस्ट केली. विराट कोहलीचं टोपण नाव चिकू आहे. धोनी विकेट कीपर असताना विराटला अनेकवेळा चिकू म्हणायचा. स्टम्प मायक्रोफोनवरही अनेकदा धोनी विराटला चिकू म्हणताना ऐकलं गेलं आहे.