मुंबई, 27 मार्च : आयपीएलच्या 16 व्या सीजनला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या नव्या सीजनसाठी क्रीडा प्रेमी उत्साहित असून यंदा विजेतेपदाची ट्रॉफी जिंकण्यासाठी संघ कसून सराव करीत आहेत. अशातच क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर स्टीव स्मिथ यंदा आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने स्टीव स्मिथच्या नेतृत्वाखाली भारता विरुद्ध वनडे मालिका जिंकली होती. यावेळी स्टीव स्मिथच्या नेतृत्व गुणाचे सर्वस्थरातून कौतुक झाले होते. स्टीव स्मिथ 2022 च्या मेगा लिलावात विकला गेला नव्हता त्यामुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतली. तसेच आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामासाठी मिनी-लिलावात देखील त्याने आपले नाव नोंदवले नाही. त्यामुळे यावर्षी देखील स्टीव स्मिथ आयपीएलमध्ये खेळणार नव्हता. परंतु आता स्टीव स्मिथने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
— Steve Smith (@stevesmith49) March 27, 2023
स्टीव स्मिथने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे सांगितले. परंतु या व्हिडिओमध्ये त्याने तो कोणत्या संघाचा भाग होणार याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. स्मिथ आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. आतापर्यंत तो आयपीएलमधील चार वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळला असून त्याने पुणे वॉरियर्ससाठी 2012 मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो राजस्थान रॉयल्सकडून 2014 आणि 2015 चा सीजन खेळला. त्यानंतर रायझिंग पुणे सुपरजायंट्स सोबत देखील तो खेळला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, IPL 2023, Steven smith