मुंबई, 27 एप्रिल : चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार ऑल राउंडर रवींद्र जडेजा हा आयपीएल 2023 मध्ये चांगल्या फॉर्मात आहे. संघाला आवश्यकता असताना जडेजा बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्हीमध्ये उत्तम खेळ दाखवत असून दरम्यान जडेजा आज सीएसके विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या होणाऱ्या सामन्यात एक मोठा पराक्रम करणार आहे. रवींद्र जडेजा 2012 पासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ससाठी खेळत आहे, तेव्हा आज राजस्थान विरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा चेन्नई सुपरकिंग्सकडून 150 वा सामना खेळणार आहे. असा सामना खेळणारा जडेजा हा चेन्नईचा तिसरा खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी एम एस धोनीने 217 तर सुरेश रैनाने 200 सामने चेन्नईसाठी खेळले आहेत. सलग 10 वर्ष रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे.
रवींद्र जडेजा हा चेन्नईकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असून त्याने आतापर्यंत जवळपास 110 विकेट्स घेतल्या आहेत. तर डावखुरा फलंदाज असलेल्या जडेजाने बॅटिंग करताना संघासाठी सुमारे 1500 हुन अधिक धावा केल्या आहेत. 2022 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आले होते. परंतु जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ फार चांगली कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे आयपीएल 2022 च्या दुसऱ्या सत्रात चेन्नईचे कर्णधारपद एम एस धोनीकडे सोपवण्यात आले होते. यानंतर जडेजा आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या फ्रेंचायझीमधील संबंध ताणले गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु धोनीने मध्यस्थी करून रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या फ्रेंचायझीची समजूत घातली.
रवींद्र जडेजाने आयपीएल 2023 मध्ये चेन्नईकडून 7 मॅच खेळताना 57 धावा केल्या असून 10 विकेट्स घेतल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चेन्नई सुपरकिंग्सने 150 वा सामना खेळणाऱ्या जडेजाचे अभिनंदन केले.