मुंबई, 22 मे : आयपीएल 2023 मध्ये झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात आरसीबीचा गुजरातकडून पराभव झाल्यामुळे मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये दणक्यात एंट्री झाली आहे. मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये जागा मिळवल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये धमाल सेलिब्रेशन केले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा मुंबई इंडियन्स हा चौथा संघ ठरला आहे. याच्या पूर्वी गुजरात टायटन्स, चेन्नई सुपरकिंग्स, लखनौ सुपर जाएंट्स या संघांनी प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केले होते. मुंबई इंडियन्सने रविवारी हैदराबाद विरुद्ध झालेला सामना जिंकला होता. परंतु त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचणे हे केवळ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर आधारित होते. कारण मुंबई आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये शेवटचा सामना जिंकून 16 पॉईंट्सवर होती, यात जर आरसीबीने गुजरात विरुद्धचा सामना जिंकला असता तर त्यांचे 16 पॉईंट्स झाले असते. आरसीबीचा नेट रनरेट हा मुंबई इंडियन्स पेक्षा जास्त असल्याने मुंबई ऐवजी आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला असता.
शुभमन गिलने गुजरात टायटन्ससाठी केलेल्या जबरदस्त फलंदाजीमुळे गुजरातचा संघ आरसीबीचा पराभव करू शकला. आरसीबीचा पराभव झालयामुळे मुंबई इंडियन्सने थेट प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यावेळी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ हॉटेलमध्ये मोठ्या स्क्रीनवर आरसीबी विरुद्ध गुजरात मॅच पाहता होता. गुजरातचा विजय झाल्यावर प्लेऑफमध्ये पोहोचल्याचा आनंदात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारत आनंद व्यक्त केला. सध्या याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.